भुसावळात पेन्शन अदालत : 92 हजारांची रक्कम कर्मचारी खात्यात
भुसावळ (18 डिसेंबर 2024) : भुसावळ रेल्वे विभागातील सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या तक्रारींवर तोडगा काढण्यासाठी सोमवार, 16 डिसेंबर 2024 रोजी भुसावळ येथील कृष्णचंद्र सभागृहात डिसेंबर 2024 च्या पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले. एकूण 79 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ज्यापैकी तीन तक्रारी पेमेंट संबंधित होत्या तर 76 तक्रारी इतर विषयांशी संबंधित होत्या. अदालतीच्या माध्यमातून 92 हजार 675 रुपये सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली. पी.पी.ओ. (पेंशन पेमेंट ऑर्डर) व परिवार पेन्शनचे पुनरावलोकन करण्यात आले. सर्व तक्रारींचे पूर्णपणे निराकरण करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी अपर मंडल रेल्वे प्रबंधक सुनील कुमार सुमन होते. यावेळी लेखा व कार्मिक विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी एन.एस.काझी यांनी तर सूत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी व्ही.एस.वडनेरे यांनी केले. या अदालतीत भुसावळ, खंडवा, जळगाव आणि अकोला पेन्शनर्स असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अपर मंडल रेल्वे प्रबंधकांनी पेन्शनर्सना भविष्यातील त्रास टाळण्यासाठी त्यांच्या तक्रारी वेळेवर सोडविण्याचे आश्वासन दिले. सेटलमेंट विभाग, लेखा विभाग तसेच सर्व कल्याण निरीक्षकांचे विशेष योगदान लाभले. आभार सहाय्यक कार्मिक अधिकारी ही.एस. वडनेरे यांनी मानले.