हरभरा, ज्वारी व मक्याची जळगाव जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पेरणी
जळगाव (2 जानेवारी 2025) : रबी हंगामात हरभरा, ज्वारी व मक्याची जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिकची पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. 2023 च्या हंगामात जळगाव जिल्ह्यात 2 लाख 27 हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची लागवड झाली होती, तर यंदा हेच क्षेत्र 2 लाख 50 हजार हेक्टर क्षेत्रापर्यंत पोहचले आहे.
114 टक्के पाऊस
जळगाव जिल्ह्यात यंदा 114 टक्के पाऊस झाला आहे. त्यात जिल्ह्यातील सर्वच लहान-मोठे प्रकल्प भरले आहेत. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रावर देखील रब्बी पिकांची लागवड झाली आहे. बहुतेक धरणांमधून रब्बी हंगामासाठी आवर्तनदेखील मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात रब्बीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. यात ज्वारी 114 टक्के, हरभरा 109 टक्के, मका 119 टक्के गाठली. गव्हाचा पेरा या 3 पिकांच्या तुलनेत कमी झाला आहे.

सध्याचे भाव काय?
हरभरा : हरभर्याचे दर गेल्या हंगामात बर्यापैकी वाढले होते. मात्र, तेव्हा शेतकर्यांकडे मालच उपलब्ध नव्हता. ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यात हरभर्याचे दर 7 हजारापर्यंत होते. मात्र, पुढील दीड ते दोन महिन्यांत हरभर्याची आवक सुरू होणार आहे. त्याआधीच हरभर्याच्या दरात घसरण झाली आहे. हरभर्याचे सद्यःस्थितीत दर 6 हजार रुपये आहेत.गव्हाचे दर सध्या स्थिर आहेत. 2400 ते 3200 रुपयांपर्यंत गव्हाचे दर आहेत. मक्याची लागवड यंदा चांगली आहे. सद्य:स्थितीत मक्याचे दर 1800 ते 2400 रुपयांदरम्यान आहेत.
गव्हाच्या भावाची खात्री नसल्याने कल बदलू शकतो
मका आणि हरभर्याच्या तुलनेत गव्हाच्या भावाची खात्री नसल्याने , त्याचप्रमाणे मका व हरभरीच्या तुलनेत गव्हाला पाणी जास्त लागत असल्याने शेतकर्यांचा कल बदलू शकतो आणि गव्हाचे लागवड क्षेत्र रब्बी हंगामात घटलेले दिसू शकते त्या तुलनेत मका हे नगदी पीक शेतकर्यांना सोयीचे वाटते आणि गव्हापेक्षा हरभर्याचे उत्पादन लवकर हातात्त येऊन शेत लवकर मोकळे होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर गव्हाचे लागवड क्षेत्र रब्बी हंगामात घटलेले दिसू शकते, असे जळगावचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी म्हणाले.


