शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई : महाराष्ट्रात येणारी 52 लाखांची प्रतिबंधीत तंबाखू जप्त
कंटेनर जप्त, चालकाला बेड्या : कारवाईने गुटखा वाहतूक पुन्हा ऐरणीवर

शिरपूर (28 मार्च 2028) : राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्यासह तंबाखूची वाहतूक कंटेनरद्वारा होत असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी कंटेनर जप्त करीत त्यातील 52 लाखांची प्रतिबंधीत तंबाखू जप्त केली. याप्रकरणी कंटेनर चालक राजेंदरसिंग सुरतसिंग (51, भली आनंदपूर, कलानोर, जि.रोहतक, हरियाणा) यास गुन्हा दाखल केल्यानंतर अटक करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना प्रतिबंधीत गुटख्यासह तंबाखूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. बुधवार, 26 रोजी हाडाखेड तपासणी नाक्यावर नाकाबंदी करण्यात आल्यानंतर मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास कंटेनर (एच.आर.55 ए.ए.8365) आल्यानंतर त्याची तपासणी केली असता त्यात 52 लाख 56 हजार रुपये किंमतीची हंस छाप प्रतिबंधीत तंबाखू (438 गोण्या) आढळली तसेच 15 लाख रुपये किंमतीचा कंटेनर मिळून 67 लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार यांनी पाहणी करीत याप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात तक्रार नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार, हवालदार संतोष पाटील, चालक अलताफ बेग, कॉन्स्टेबल स्वप्नील बांगर, कॉन्स्टेबल योगेश मोरे, कॉन्स्टेबल संजय भोई, कॉन्स्टेबल धनराज गोपाळ, कॉन्स्टेबल सुनील पवार, हवालदार रमेश माळी, कॉन्स्टेबल जयेश मोरे, कॉन्स्टेबल इसरार फारुकी आदींच्या पथकाने केली.