अंबाजोगाई हादरले : बहिणीवर प्रेम करणार्‍या युवकाची कोयत्याने हत्या


Ambajogai shaken: Young man who loved his sister killed by a scythe अंबाजोगाई (2 एप्रिल 2025) : राज्यात विविध कारणांमुळे चर्चेत येत असलेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा खुनाची घटना समोर आली आहे. बहिणीवर तरुण प्रेम करीत असल्याच्या संशयातून त्याची कोयत्याने हत्या करण्यात आली. मंगळवारी सकाळी शहरातील पोखरी रोडवर हा थरार घडला. तिघांविरोधात अंबाजोगाई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
राजकुमार साहेबराव करडे (25, रा. गवळीपुरा, अंबाजोगाई) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

राजकुमार हा सकाळी पोखरी रोड परिसरात एका हॉटेलसमोर उभा होता. यावेळी बहिणीवर प्रेम करणार्‍या राजकुमार याला धडा शिकविण्यासाठी मुलीचा भाऊ वेदांत वैजनाथ शिंदे व आदिनाथ भांडे (रा. सारडानगरी) यांनी राजकुमारला हॉटेलवर गाठले. कोयत्यासह धारदार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या गळ्यावर, डोक्यात, पाठीवर सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात राजकुमार गंभीर जखमी झाला. त्याच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही अतिरक्तस्त्रावामुळे राजकुमारचा दुपारी मृत्यू झाला.




याप्रकरणी केशाबाई साहेबराव करडे (रा. येल्डा रोड, गवळीपुरा, अंबाजोगाई) यांच्या फिर्यादीवरून अल्पवयीन मुलीचे वडील वैजनाथ शिंदे, भाऊ वेदांत शिंदे, आदिनाथ भांडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक अनिल चोरमले करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !