मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत भुसावळ तालुक्यातील सहा शाळांचा सन्मान


Six schools in Bhusawal taluka honored under Chief Minister’s ‘My School, Beautiful School’ initiative भुसावळ (21 एप्रिल 2025) : मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत तालुक्यातील सहा शाळांना गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण समारंभ मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते एन.के.नारखेडे विद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.

या शाळांचा सन्मान
या अभियानात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोंढाळे (प्रथम), जि.प.प्राथमिक शाळा महादेवमाळ (द्वितीय) आणि जि.प. प्राथमिक शाळा टहाकळी (तृतीय) या शाळांनी क्रमश: यश मिळवले.
खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये नेहरू विद्यामंदिर तळवेल (प्रथम), श्री शारदा माध्यमिक विद्यालय दीपनगर (द्वितीय) आणि महात्मा गांधी विद्यालय वरणगाव (तृतीय) या शाळांचा सन्मान करण्यात आला.

शिक्षणाची वाढावी गुणवत्ता
मंत्री संजय सावकारे यांनी शाळांमध्ये होत असलेल्या सकारात्मक बदलांबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी समाज घडवण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत, पुरस्काराच्या निधीतून शाळांमध्ये भौतिक सुविधांची वाढ करून शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्याबाबत आशावाद व्यक्त केला. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी केले. उपक्रमाचे महत्त्व आणि कार्यपद्धती गटविकास अधिकारी सचिन पानझाडे यांनी स्पष्ट केली.
सूत्रसंचालन राहुल भारंबे तर आभार शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान यांनी मानले. कार्यक्रमाला शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व संचालक मंडळ उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सर्व केंद्रप्रमुखांनी परिश्रम घेतले.

15 शिक्षकांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव
राज्य शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्यामार्फत आयोजित राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा या उपक्रमामध्ये भुसावळ तालुक्यातील विविध गटामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त 15 शिक्षकांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये मेघशाम सपकाळे, भारती अवचारे, दीपाली पाटील, भाग्यश्री लोहार, क्रांती ढाके, निशा पाटील, पूर्णिमा नेमाडे, प्रियंका कांबळे, वंदना पाटील, क्रांती वाघ, नूरुलहुदा कुरेशी, अल्तमश खान, कविता पाटील, नीलिमा पाटील, प्रशांत ढाके यांचा सन्मान करण्यात आला. यशस्वीतेसाठी गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांचे मार्गदर्शन लाभले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !