भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई : वलसाडहून खून करून पसार दोन संशयीतांना अटक


भुसावळ (5 जुलै 2025) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात ‘ऑपरेशन रेल प्रहरी’ अंतर्गत रेल्वे सुरक्षा दलाने अतिशय कौशल्याने खून प्रकरणातील दोन संशयीतांना अटक केली आहे. 2 जुलै रोजी वलसाड (गुजरात) येथील डुंगरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन संशयीतानी खून करून रेल्वे 22914 अप सहरसा-बांद्रा एक्स्प्रेसने पळ काढला होता. त्या दोन्ही संशयीतांना भुसावळ जंक्शनवर अटक करण्यात आरपीएफला यश आले.

बडोदा येथील पोलीस अधीक्षकांनी याबाबतची माहिती व संशयीतांचे फोटो रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ आयुक्त चित्रेश जोशी यांना पाठवले. त्यांनी तात्काळ निरीक्षक पी. आर. मीना यांच्यासह एक विशेष पथक तयार केले. या पथकात अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. गाडी भुसावळ जंक्शनवर प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर पोहोचताच पथकाने झाडा झडती घेतली आणि संशयीत अभिषेक कुमार (21) व अल्पवयीनाला ओळखून ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ते झारखंडमधील नवडीहा, गोंड्डा येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले.









डुंगरा पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. दोन्ही संशयीतांना ताब्यात घेत त्यांना आरपीएफ ठाण्यात ठेवले होते. गुरूवारी सकाळी 6.10 वाजता गुजरात पोलीस पथक भुसावळला पोहोचले आणि संबंधित कागदपत्रांची पूर्तता करून दोन्ही संशयीतांना ताब्यात घेतले. ही कारवाई रेल्वे पोलिसांच्या दक्षतेचे आणि तत्परतेचे उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !