विधान भवनाचा आखाडा : आधी नेते भिडले नंतर कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी


मुंबई (17 जुलै 2025) :  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड व सत्ताधारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वादाचे गुरुवारी विधानभवन परिसरात तीव्र पडसाद उमटले. या दोन्ही नेत्यांचे समर्थक गुरुवारी सायंकाळी थेट विधानभवनाच्या लॉबीत एकमेकांना भिडले.

काय आहे नेमके प्रकरण
विधानभवनाच्या लॉबीमध्ये दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये ही धक्काबुक्की झाली. यावेळी दोन्ही नेत्यांच्या कार्यकत्यांनी एकमेकांच्या अंगावर धावून जात मारहाण केली तर तिथे उपस्थित असलेले सुरक्षा रक्षक आणि इतरांनी मध्ये पडून दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना दूर केले.


काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवनाच्या परिसरात गोपीचंद पडळकर यांना मंगळसूत्र चोर म्हणून डिवचल्यानंतर या वादाला सुरुवात झाली होती. त्यानंतर काल गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड आमने सामने आले असता दोन्हीकडून एकमेकांना शिविगाळ करून धमकावण्यात आले होते. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या आवारातच एकमेकांना भिडल्याने या वादाने गंभीर वळण घेतलं आहे.

तर आमदार रहायचे कशाला ?
विधानसभेत विधिमंडळाच्या पायर्‍यांवर आमदार सुरक्षित नसतील, तर कशाला राहायचे आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कुणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई-बहिणींवर शिव्या देतो. त्याला ऑफिशिअल लँग्वेज म्हणून घोषित करा. असंसदीय शब्द वापरले जातात. त्यालाच आता संसदीय शब्द म्हणून घोषित करा. सत्तेचा एवढा माज, असा तीव्र संताप आमदार आव्हाड यांनी व्यक्त केला.

दोषींवर कारवाई हवी : उद्धव ठाकरे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. हाणामारी करणारे समर्थक होते का गुंड होते? येथे अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर विधानभवनाला अर्थ काय? ज्यांनी या लोकांना पास दिले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मग तो कोणत्याही पक्षाचा असो. ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचे नाव पुढे आले पाहिजे. शेवटी हा अधिकार अध्यक्षांचा असतो. अध्यक्षांची दिशाभूल केली गेली का? हा पण विषय आहे. पण अशी मारामारी आमदारांना धक्काबुक्की ही गुंडागर्दी आता विधानभवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी सर्व विषय सोडून या गुंडांवर व त्यांच्या पोषिंद्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. असे झाले तरच तुम्ही मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवण्याच्या पात्रतेचे आहात असे मी म्हणेन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !