हनी ट्रॅपचे रॅकेट मोठे : 50 मंत्र्यांसह अधिकारी अडकले : विजय वडेट्टीवारांचा दावा
Honey trap racket is big: 50 ministers and officials trapped : Vijay Vadettiwar claims मुंबई (23 जुलै 2025) : हनीट्रॅपचे खूप मोठे रॅकेट आहे. त्यात अनेक मोठे मासे अडकले आहेत. साधारण 50 तरी मंत्री आणि अधिकारी यात अडकले आहेत. हनी ट्रॅपमध्ये मोठे अधिकारी, मंत्री, राजकारणातले अनेक आजी-माजी मंत्री यामध्ये आहेत. ज्यांचे नाव पुढे आले तो लोढा याने अनेकांकडून पैसे घेतले आहेत. त्याने किमान 200 कोटींची वसूली केली असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणात अनेक लोक अडकले आहेत, कोणत्याही पक्षाचा माणूस असो त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
तर सरकारने केले नाही निवेदन
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी गेल्या आठवड्यात विधानसभेत मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचे केंद्र असल्याचा आरोप केला होता. तसेच या प्रकरणातील पेनड्राईव्ह देखील त्यांनी सभागृहात दाखवले होते. विधानसभा अध्यक्षांना हनीट्रॅपच्या मुद्यावर निवेदन करण्यास सांगितले, पण त्यांच्या सुचनेनंतरही सरकारने निवेदन केले नाही. ना हनी ना ट्रॅप, आमच्यापर्यंत नाना पटोलेंचे बॉम्ब पोहोचलेच नाहीत, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी खिल्ली उडवली होती. आता विजय वडेट्टीवार यांनी देखील हा मुद्दा उपस्थित केला आहे.





सुरज चव्हाणबद्दल काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
सुरज चव्हाणने ज्या छावा कार्यकर्त्याला मारले त्याच्यावर कारवाई करताना पोलिसांना वेळ लागत आहे. सुरज चव्हाणने जे केले त्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समर्थन करत आहेत, असा याचा अर्थ होतो. अशा प्रकारच्या कृतीला समर्थन आहे का ते मुख्यमंत्र्यांनी सांगावे किंवा सुरज चव्हाणला अटक करावी, अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी केली आहे.
माणिकराव कोकाटे यांच्याविषयी काय म्हणाले वडेट्टीवार?
या सरकारला थोडी जरी लाज शरम असेल तर माणिकराव कोकाटेंवर कारवाई होईल. शेतकर्यांना आणि सरकारला भिकारी म्हणणार्या, सभागृहात रमी खेळणार्या माणसावर कारवाई केली जाईल. माणिकराव कोकाटेंना एक मिनिटही त्या पदावर ठेवू नये अशी आमची मागणी आहे. सरकारला शेतकर्यांबाबत प्रेम, कळवळा असेल तर त्यांनी त्वरित कारवाई केली पाहिजे अशीही मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. या सरकारला शेतकर्यांच्या भावनांशी देणं घेणं नाही, असे वक्तव्य करणार्या कृषी मंत्राला पाठीशी घालणार आहे का? रमी खेळणारा मंत्री कृषी मंत्री आहे, असे आम्ही सांगू का? असा संतप्त सवालही विजय वडेट्टीवार यांनी केला. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर ते बोलत होते.
