मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपींची निर्दोष सुटका : उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च स्थगिती
Mumbai blasts accused acquitted : Supreme Court stays High Court’s decision मुंबई (24 जुलै 2025) : सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी 2006 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारसह या प्रकरणातील पीडित कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
12 आरोपींची निर्दोष सुटका
मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातील सर्वच 12 आरोपींची निर्दोष सुटका केली होती. त्यानंतर लगेचच या आरोपींची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. कोर्टाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला होता. तसेच जनतेतूनही तीव्र संताप व्यक्त केला जात होता त्यामुळे शासनाने तत्काळ या आदेशांविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने गुरूवारी हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली तसेच सर्वच आरोपींना नोटीसही बजावली. सुटका करण्यात आलेल्या आरोपींना पुन्हा तुरुंगात परत पाठवण्याची गरज नसल्याचेही स्पष्ट केले.





आदेशाला स्थगिती देण्याची मागणी
महाराष्ट्र सरकारतर्फे बाजू मांडणार्या सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनीही कोर्टाकडे आरोपींना पुन्हा तुरुंगात पाठवण्याचे आदेश देण्याची मागणी केली नव्हती. त्यांनी केवळ हायकोर्टाच्या आदेशांना स्थगिती देण्याची मागणी केली. हायकोर्टाने आपल्या आदेशात नोंदवलेल्या काही निरीक्षणांमुळे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) प्रलंबित असलेल्या इतर खटल्यांवर परिणाम होऊ शकतो, असा युक्तिवाद यावेळी मेहता यांनी केला. त्यावर कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा प्रस्तुत प्रकरणातील निर्णय इतर कोणत्याही प्रकरणात उदाहरण म्हणून देता येणार नाही असे स्पष्ट केले.
