आक्षेपार्ह पोस्टमुळे यवतमध्ये तणाव : दोन गटांची तुफान दगडफेक
Tension in Yavat due to offensive post : Two groups pelt stones पुणे (1 ऑगस्ट 2025) : सोशल मिडीयातून आलेल्या एका पोस्टमुळे दोन गटात जातीय तणाव निर्माण होवून तुफान दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन स्थितीवर नियंत्रण मिळवले. सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांकडून या घटनेची माहिती घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही थेट घटनास्थळी स्थितीचा आढावा घेतला.
काय घडले नेमके ?
दौंड तालुक्यातील यवत गावातील एका समुदायाच्या तरुणाने शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट केली. या पोस्टची माहिती मिळताच गावात तणाव निर्माण झाला. त्यानंतर शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास यवतचा आठवडी बाजार बंद करण्यात आला. यावेळी एका गटाच्या लोकांनी काही दुचाकी पेटवून दिल्या. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण स्थिती उद्भवली. यवतचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले की, आक्षेपार्ह तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. सध्याचा तणाव पाहता गावात मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.





पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
पोलिसांच्या माहितीनुसार, आक्षेपार्ह पोस्ट करणारा तरुण यवतच्या सहकार नगर भागात राहतो. पोस्टनंतर संतप्त जमावाने त्याच्या घराची तोडफोड केली. यावेळी काही लोकांनी एका धार्मिक स्थळावर दगडफेकही केली. यामुळे तणाव वाढला. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
अधिकार्यांची घटनास्थळी धाव
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) संदीप गिल यांनी यवतच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी पोलिसांना स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ते निर्देश दिले. यावेळी बोलताना ते म्हणाले, एका तरुणाने आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आरोपी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर कारवाईही करण्यात आली आहे. या घटनेनंतर काही लोक एकत्र जमल्यामुळे गावात तणाव निर्माण झाला. पण पोलिसांच्या आवाहनानंतर शांतता प्रस्थापित झाली आहे. सध्या गावात कोणताही तणाव नाही. आमची पेट्रोलिंग येथे सुरू आहे.
या घटनेत काही दुचाकी व दुकानांची जाळपोळ करण्यात आली. पण पोलिस अधीक्षकांनी जाळपोळ झाल्याचा दावा फेटाळला. त्याला जाळपोळ म्हणता येत नाही. काही ठिकाणी काचा फुटल्यात. संतप्त जमाव एक-दोन ठिकाणी गेला होता. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना शांततेचे आवाहन केले. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. येथील स्थिती निवळली आहे, असे ते म्हणाले.
