’केम छो’ बारवर धाड ; 18 बारबालांसह एकूण 36 जणांवर गुन्हा
Raid on ‘Kem Cho’ bar ; 36 people including 18 bar boys booked मुंबई (5 ऑगस्ट 2025) : मीरारोडच्या मुंबई – अहमदाबाद महामार्गावर असलेल्या केम छो ह्या ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांच्या धाडीत तब्बल 18 बारबाला सापडल्या तर यावेळी काहीजणी अश्लील डान्स करत होत्या. पोलीस आल्याची वर्दी देण्यासाठी अलार्म आणि बारबालांना लपण्यासाठी गुप्त खोली व तेथून पळण्यासाठी वाट केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी 36 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले कारवाईत
मीरा भाईंदर शहरात ऑर्केस्ट्रा बारच्या आड सर्रास अश्लील नाच व गैरप्रकार चालतात. त्यातच मुंबई-अहमदाबाद महामार्गावर लता मंगेशकर पालिका नाट्यगृह जवळ ’केम छो’ हा ऑर्केस्ट्रा बार आहे. सदर बारमध्ये मोठ्या संख्येने बारबाला ह्या अश्लील नाच करत असल्याची माहिती वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास हंडोरे यांना मिळाली. त्यांनी पोलीस पथकासह छापा मारला असता आत 2 बारबाला अश्लील हावभाव करत नाचत होत्या. तर, अन्य 5 बारबाला दिसल्या.





मात्र, बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार आतमध्ये आणखी बारबाला मेकअप रूमच्या मागील पार्टीशन लगत खोलीत असल्याचे समजले. पोलिसांनी तेथे गुप्त दरवाजा शोधला व चावीने दार उघडले असता, मागे अरुंद बोळ दिसून आला. त्या ठिकाणी 11 बारबाला सापडल्या. तेथून मागच्या बाजूने पळून जाण्यासाठी वाट केलेली होती. मात्र पोलिसांनी बाहेरून नाकाबंदी केल्याने ह्या बारबालांना पळून जाता आले नाही. तर बारच्या प्रवेशद्वार जवळ एक अलार्म बटन आढळून आले. पोलीस आले की ते वाजवून आतील बारबालांना पळून जाण्याची सूचना केली जात असे.
काशीमीरा पोलीस ठाण्यात 18 बारबालांसह बारचा व्यवस्थापक चंद्रशेखर शेट्टी सह बार कर्मचारी मिळून एकूण 36 जणांवर गुन्हा दाखल केला. बारमधून 1 लाख 1 हजार 770 रोख , स्वाईप मशीन जप्त केली आहे. बारचा चालक, मालक, भागीदार ह्यांना पाहिजेत आरोपी म्हणून गुन्ह्यात दाखवले आहे.
सदर बार हा पालिका व पोलिसांनी अनधिकृत म्हणून जमीनदोस्त केला होता. पालिकेने एमआरटीपीचा गुन्हा दाखल केला होता. तरी देखील न्यायालयाचा स्थगिती आदेश असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येऊन सदर बारचे बांधकाम पुन्हा होऊन बार सुरू झाला.
