जळगाव जिल्हावासीयांसाठी गुड न्यूज : पुणे-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार !
Good news for the residents of Jalgaon district: Pune-Nagpur Vande Bharat Express will start! भुसावळ (5 ऑगस्ट 2025) : पुणे-नागपूर (अंजनी) ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस लवकरच सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली आहे.
पुणे-नागपूर (अजनी) मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार असल्यावर रेल्वे बोर्डाने शिक्कामोर्तब केले आहे. या महिन्याच्या शेवटी अथवा सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.





मुंबई-नागपूर किंवा पुणे-नागपूर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची अनेक दिवसांपासून प्रवाशांची मागणी होती. त्यानुसार केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे रेल्वे मंत्री यांची भेट घेऊन तसेच पत्र व्यवहार करून अनेकवेळा मागणी केली. या मागणीला यश आले आहे. लवकरच पुणे-नागपूर (अजनी) मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे.
वंदे भारत एक्स्प्रेस मुळे अवघ्या 12 तासांत पुणे ते नागपूरचा प्रवास होणार आहे. ही गाडी या मार्गावरील सर्वांत वेगवान रेल्वे ठरणार आहे. सध्या पुणे-नागपूर मार्गावर हावडा-दुरांतो एक्स्प्रेस ही सर्वांत जलद रेल्वे आहे. पुणे ते नागपूर अंतर कापण्यासाठी दुरांतोला 12 तास 55 मिनीटे वेळ लागतो. ‘वंदे भारत’ ला त्याहून एक तास कमी वेळ लागणार आहे.
असे असेल ‘वंदे भारत’चे वेळापत्रक
पुण्याहून सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी सुटेल व अजनीला सायंकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी पोहोचणार आहे. अजनीहून सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी सुटेल. पुण्याला रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी पोहोचेल तर दौंड कॉर्डलाइन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा व वर्धा या स्टेशनवर सदर वंदे भारत एक्स्प्रेसला थांबा असेल.
