रानभाजी खा, निरोगी रहा : जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील
80 स्टॉलमधून पावसाळी हंगामातील रानभाज्यांची विविधता रसिकांसमोर

Eat wild vegetables, stay healthy : Guardian Minister Gulabrao Patil in Jalgaon जळगाव (10 ऑगस्ट 2025) : आपल्या धकाधकीच्या जीवनशैलीत आहाराचा फार मोठा वाटा आहे. आरोग्य टिकवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वडिलोपार्जित रानभाज्यांचा आहारात समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. रानभाज्या ही खरी निसर्गाची देण असून त्यावर रासायनिक फवारणी नसल्याने त्या सेंद्रिय, सुरक्षित व पोषक असतात. कोरोना काळात याच रानभाज्यांनी अनेकांना आरोग्य लाभवला होता. नव्या पिढीला यांची ओळख करून देणारा हा रानभाजी महोत्सव महत्त्वपूर्ण आहे. पावसाळी हंगामात मिळणार्या या भाज्यांपासून विविध पदार्थ बनवून ‘रानभाजी खा… निरोगी रहा’ हा मूलमंत्र सर्वांनी स्वीकारावा, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
जळगावात रानभाजी महोत्सव
जळगाव शहरातील मायादेवी नगर येथील रोटरी भवन येथे प्रकल्प संचालक (आत्मा) जळगाव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, कृषी विज्ञान केंद्र जळगाव-पाल आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात जिल्हाभरातून आलेल्या शेतकरी गट व महिला बचत गटांनी पारंपरिक पद्धतीने पिकवलेल्या रानभाज्यांचे आणि प्रक्रिया उद्योगाचे तब्बल 80 स्टॉल लावून पावसाळी हंगामातील विविधतेचा मेवा रसिकांसमोर मांडला. उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी या वेळी विविध रानभाज्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतला. रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या तर्फे 75 गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार पद्धतीची दप्तरं वाटपही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदिवासी महिलांनी रान मेवा भेट देऊन त्यांचे स्वागत केले.

बहिणींनी बांधल्या पालकमंत्र्यांना राख्या
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज रान भाज्या महोत्सवाचे उदघाटन केल्या नंतर या रानभाजी महोत्सवात सहभागी बहिणींनी काल झालेल्या राखी पौर्णिमेच्या निमित्ताने आज पालकमंत्र्यांना राखी बांधून भावा प्रतीचा स्नेह दाखवून दिला. तर पालकमंत्र्यांनी आपल्या या सर्व बहिनींच्या मदतीसाठी कायम तत्पर असल्याचे बोलून दाखविले.
पारंपरिक नृत्यांनी मिळवली दाद
महोत्सवात यावल तालुक्यातील आदिवासी बांधवांनी पारंपरिक आदिवासी नृत्य व वाद्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या कलागुणांचे विशेष कौतुक केले. ग्राहकांसाठी रानभाज्यांची विक्रीबरोबरच विविध रानभाज्यांच्या पाककृतींची माहिती देण्यात आली. पाककला स्पर्धेत विजेत्या शेतकर्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मॉडेल अधिकारी (स्मार्ट) श्रीकांत झांबरे यांनी केले, तर आभार प्रकल्प उपसंचालक भरत इंगळे यांनी मानले.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे अध्यक्ष गौरव सापळे, प्रकल्प प्रमुख योगेश भोळे, सचिव देवेश कोठारी, महेश सोनी, कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
