अंजली दमानियांया इशारा : मुंडेंची मंत्रीपदी वर्णी लागल्यास फडणवीसांना माफ करणार नाही
Anjali Damania’s warning : If Munde is appointed to a ministerial post, I will not forgive Fadnavis मुंबई (17 डिसेंबर 2025) : राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे यांची मंत्री पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर आता अजित पवारांच्याच पक्षातील माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजधानी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने नव्या चर्चांना सुरूवात झाली आहे. त्यातच मुंडे यांच्या भेटीमागे अनेक शक्यता वर्तवली जात असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत जोरदार टीका केली आहे. धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या जन्मी माफ करणार नसल्याचे दमानिया यांनी ठणकावून सांगितले आहे.
भाजपासाठी काय बोलू, शब्दच नाहीत
अंजली दमानिया यांनी ट्विट करत म्हटले की, ना खाउंगा ना खाने दुंगा म्हणणार्या पक्षाचे अमित शहा, मला म्हणजे भ्रष्टाचारा विरोधात लढणार्या व्यक्तिला वेळ देत नाहीत, पण अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि आता धनंजय मुंडे यांना भेटण्याची वेळ देतात. यात काय ते समजून जा, असे दमानिया यांनी म्हटले आहे. तसेच भाजपला काय बोलू, शब्दच उरले नाहीत, अशी टीका दमानिया यांनी केली आहे.


… तर फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही
अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर असलेल्या आरोपांची थेट यादीच केली आहे. त्या म्हणाल्या, ज्या धनंजय मुंडेंवर 1) बीड बँक घोटाळ्याचे आरोप आहेत, 2) बंदूक राज आणल्याचे आरोप आहेत, 3) महाजेनकोमधून राख चोरल्याचे आरोप आहेत, 4) आवादा कंपनीकडून खंडणी मागीतल्याचे आरोप आहेत, 5) कृषी घोटाळ्याचे आरोप आहेत, 6) दहशत, बंदूकराज, गुंडाराज केल्याचे आरोप आहेत आणि सगळ्यात किळसवाणे म्हणजे ज्या क्रूर पद्धतीने स्व. संतोष देशमुख यांची हत्या ज्यांनी करवून घेतली त्या विकृत वाल्मीक कराडची उणीव भासते, असे म्हणणारे धनंजय मुंडे जर परत मंत्री म्हणून परत आले, तर या भाजपचा बहिष्कार लोकांनी केला पाहिजे, असे दमानिया म्हणाल्या.
फडणवीसांनी हे होऊ दिले, तर मी या जन्मी त्यांना माफ करणार नाही, असे अंजली दमानिया यांनी स्पष्ट म्हटले आहे.







