मुक्ताईनगरात कंटेनर चालकाने लावला दोन लाखांचा चुना
In Muktainagar, a container truck driver defrauded someone of two lakh rupees मुक्ताईनगर (26 डिसेंबर 2025) : एका नामांकित ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कंटेनर चालकाने कंपनीचा विश्वासघात करून सुमारे 2 लाख 7 हजार रुपये किमतीच्या टायर आणि ट्यूबचा अपहार केला. मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव जवळील एका ढाब्यावर आपला कंटेनर सोडून हा चालक पसार झाला असून मुक्ताईनगर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे प्रकरण ?
‘संधु लॉजिस्टिक इंडिया प्रा.लि.’ या कंपनीचे डेप्टी मॅनेजर अक्षीत विनयकुमार पांडे (रा. नवी दिल्ली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कंपनीने त्यांचा कंटेनर (एन.एल.01 जी.8685) अपोलो कंपनीचे 399 टायर, फ्लॅप आणि ट्यूब असा एकूण 69 लाख 99 हजार 997 रुपयांचा माल चेन्नई येथून इंदूर येथे पोहचवण्यासाठी चालक अमितसिंग विरंदरसिंग (रा. उत्तर प्रदेश) याच्या ताब्यात दिला होता. हा माल इंदूरला पोहचवणे अपेक्षित असताना, प्रवासादरम्यान आरोपी चालकाने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कंटेनरमधील मालावर डल्ला मारला.

त्याने कंटेनरमधून एक लाख 91,360 रुपये किंमतीचे 14 ट्रक टायर, 11 हजार 494 रुपये किंमतीचे 14 फ्लॅप आणि 4,186 रुपये किमतीचे 14 ट्यूब असा एकूण दोन लाख 7 हजार 40 रुपयांचा माल परस्पर काढून घेतला. मालाची विल्हेवाट लावल्यानंतर आरोपीने कंटेनर मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथील ‘बाबा रामदेव ढाब्या’च्या आवारात उभा केला आणि तिथून तो फरार झाला.
बराच वेळ उलटूनही कंटेनर नियोजित स्थळी न पोहोचल्याने आणि चालकाशी संपर्क होत नसल्याने कंपनीने शोध घेतला असता, कंटेनर बेवारस स्थितीत मिळून आला. मालाची तपासणी केली असता त्यातील काही हिस्सा गायब असल्याचे दिसून आले. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा नोंदवण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय खंडेराव करत आहेत.
