भुसावळ रेल्वे स्थानकावर महिला आरोग्य व स्वच्छतेबाबत जनजागृती
मध्य रेल्वे महिला कल्याण संघटनेतर्फे सॅनिटरी पॅड वितरण उपक्रम
भुसावळ (31 डिसेंबर 2025) : मध्य रेल्वे महिला कल्याण संघटना भुसावळ यांच्या वतीने भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात महिलांच्या आरोग्य व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी सॅनिटरी पॅड वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम मंगळवार, 29 डिसेंबर 2025 रोजी राबविण्यात आला.
या कार्यक्रमाचे नेतृत्व मध्य रेल्वे महिला कल्याण संघटनेच्या अध्यक्षा रेखा अग्रवाल यांनी केले. त्यांच्या उपस्थितीत भुसावळ रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या महिला कर्मचार्यांना सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यात आले. यावेळी संघटनेच्या सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महिलांच्या आरोग्य संरक्षणासाठी मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करत योग्य स्वच्छता पद्धतींचा अवलंब करण्याबाबत महिलांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. अशा उपक्रमांमुळे महिलांचे आरोग्य सुधारण्यासोबतच त्यांचा आत्मसन्मान व कार्यक्षमता वाढीस लागते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
मध्य रेल्वे महिला कल्याण संघटनेतर्फे महिलांच्या सर्वांगीण कल्याणासाठी राबविण्यात येणार्या सामाजिक उपक्रमांपैकी हा एक महत्त्वाचा उपक्रम असून भविष्यातही अशा प्रकारचे जनजागृती कार्यक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.
