भुसावळ पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी-विरोधकांक भिडले : गदारोळानंतर सभा तहकूब
भाजपा नगरसेवकांची जोरदार घोषणाबाजी : तहकूब सभा होणार मंगळवारी
भुसावळ (13 मार्च 2026) : भुसावळ पालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी दुपारी चार वाजता नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली मात्र सभेला सुरुवात होण्यापूर्वीच नगराध्यक्षांच्या आसनाजवळ भाजपा गटनेता निवेदन देण्यासाठी गेल्याने यावर आक्षेप सत्ताधार्यांनी नोंदवल्यानंतर प्रचंड गदारोळ झाला. यावेळी विरोधातील भाजपा नगरसेवक व सत्ताधारी नगरसेवक समोरा-समोर आल्यानंतर शाब्दीक वादामुळे गोंधळ अधिकच वाढून सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले. नगराध्यक्षांनी सभा तहकूब झाल्याचे म्हणताच त्यांच्यासह सत्ताधार्यांनी दालन सोडल्यानंतर भाजपेयी अधिक संतप्त झाले व त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली.
काय घडले पालिका सभेत?
शुक्रवारी पालिकेची सर्वसाधारण सभा असल्याने चार वाजेपूर्वीच सभासद दालनात दाखल झाले. दुपारी 4.18 वाजता प्रत्यक्षात सभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी नगरसेवक पिंटू कोठारी व नगरसेवक पिंटू ठाकूर यांनी रमजान व शिवपुराण कथा सुरू असल्याने सभेची वेळ गैरसोयीची असल्याचे म्हणत यापुढे सकाळच्या वेळी सभा घेण्याचे सूचवले.




गटनेता व्यासपीठाजवळ गेल्यानंतर वाढला गोंधळ
भाजपा गटनेता युवराज लोणारी हे मागील सभेचे प्रोसेडिंग कुठे आहे ? याबाबत विचारणा केल्यानंतर त्यावर हरकत घेत व्यासपीठाजवळ नगराध्यक्षांशी चर्चा सुरू केली असताना नगरसेवक चौधरी यांनी याबाबत हरकत नोंदवली. सदस्यांनी आपल्या जागेवर राहून बोलावे, असे म्हटल्यानंतर वादाला सुरूवात झाले. यावेळी शाब्दीक वाद वाढतच गेल्यानंतर सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दीक फैरी सुरू झाल्या व या गदारोळातच नगराध्यक्षांनी सभा तहकूब झाल्याची घोषणा करीत दालन सोडले. त्यानंतर सत्ताधारी नगरसेवकही बाहेर पडले.
भाजपा नगरसेवकांची घोषणाबाजी
सत्ताधारी सभागृहाबाहेर पडलेतरी सत्ताधारी गटनेता युवराज लोणारी यांनी भाजपा नगरसेवकांना खुर्चीवर बसण्याचे आवाहन करीत मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांना नियमावली सांगत कायद्यानुसार सभागृहात सभा चालावी, असे सांगितले. सत्ताधार्यांच्या विरोधात त्यांनी यावेळी रोष व्यक्त केल्यानंतर भाजपा नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दादागिरी चालू देणार नाही, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे, मुख्याधिकारी राजेंद्र फातले, गटनेता सचिन चौधरी आदींची उपस्थिती होती.

तहकूब सभा मंगळवारी
नगरसेवकांच्या प्रचंड गदारोळानंतर तहकूब सभा आता मंगळवारी दुपारी चार वाजता घेण्यात येणार असून या सभेकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
सभेच्या अजेंड्यावर 341 विषय
सभेच्या अजेंड्यावर तब्बल 341 विषय असून त्यात बंद पडलेली सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत करण्यासह भुसावळकरांसाठी पालिकेच्या ईमारतीवर नाट्यगृहाची उभारणी, नगराध्यक्षांसह मुख्याधिकार्यांसाठी नवीन स्कॉर्पिओ वाहन खरेदी, शहरातील पुतळ्यांसाठी सीसीटीव्ही, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे योजनेंतर्गत विविध कामे करणे, पाणीटंचाई संदर्भात उपाययोजना, शहरातील वातानुकूलित शौचालयांची उभारणी, शहराच्या चौफेर प्रवेशद्वार उभारणे, जामनेर रोडवरील स्वच्छतागृहांची उभारणी करणे यासह विविध विकासात्मक विषय सभेच्या अजेंड्यावर आहेत.