राम मंदिर लुटणार्‍यांना हिंदू माफ करणार नाही : उद्धव ठाकरेंचा घणाघात


Hindus will not forgive those who looted the Ram Mandir: Uddhav Thackeray’s scathing attack. मुंबई (5 जुलै 2026) : हिंदुत्वाचा गैरफायदा घेऊन जर कोणी राम मंदिर लुटत असेल तर आता हिंदू त्यांना माफ करणार नाही, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराच्या दानपेटीत झालेल्या कथित चोरी आणि निधी अपहाराच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली. या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी रविवारी दादरच्या ऐतिहासिक हनुमान मंदिरात (पुरातन वटवृक्ष मंदिर) ठाकरे गटाच्या वतीने ‘रामरक्षा आंदोलना’ची हाक देण्यात आली आहे. या ठिकाणी रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालिसाच्या पठणासह महाआरती करून या राज्यव्यापी आंदोलनाचा शंखनाद केला. भरपावसात शिवसैनिक या आंदोलनासाठी उपस्थित राहिले. यावेळी ठाकरेंची तोफ धडाडाली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
आपल्या आक्रमक शैलीत ठाकरे म्हणाले की, राम मंदिर आंदोलनानंतर ज्या दंगली उसळल्या, त्याचे सर्वाधिक चटके मुंबईने सोसले त्यावेळी हिंदू भयग्रस्त असताना देशात केवळ एकच नेता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला, ते म्हणजे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे! आपण कट्टर आणि देशाभिमानी हिंदू आहोत. आम्ही हिंदू भोळे आणि भाबडे नक्कीच आहोत, पण मूर्ख नाही.

अयोध्येतून साधू-संत दाखल
या रामरक्षा आंदोलनाचे आणि महाआरतीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, यात सहभागी होण्यासाठी थेट अयोध्येहून काही साधू-संत आणि महंत दादरमध्ये दाखल झाले आहेत. पक्षाचे प्रवक्ते आनंद दुबे यांच्यासह हे सर्व पंडित व महंत या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवणार असून, राम मंदिरातील अपहाराविरोधात आवाज उठवणार आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व स्वतः माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. त्यांच्यासोबत युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत यांच्यासह मुंबईभरातील शेकडो शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेनेचे मोठे योगदान
राम मंदिर उभारणीतील शिवसेनेच्या योगदानाची आठवण करून देताना ठाकरे यांनी सत्ताधार्‍यांवर निशाणा साधला. जेव्हा ‘मंदिर वहीं बनायेंगे’च्या घोषणा दिल्या जात होत्या, तेव्हा शिवसैनिकांनी जेवढे काम केले, तेवढे इतर कोणाही केले नसेल. शिलापूजन, रथयात्रा आणि प्रत्यक्ष अयोध्येत जाऊन केलेली कारसेवा यात अनेक शिवसैनिकांनी रक्त सांडले, अनेकांचे जीव गेले.

हिंदुत्वाचा गैरफायदा घेण्यासाठीच शिवसेनेला संपवण्याचा विडा
उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हिंदुत्वाचा केवळ राजकीय फायद्यासाठी वापर करत असल्याचा गंभीर आरोप केला. ते म्हणाले की, ज्या राम मंदिरासाठी आपण मेहनत केली, तीच व्यक्ती आज पंतप्रधानपदी बसली आहे मात्र तिथे बसल्यानंतर त्यांनी सर्वात आधी कट्टर हिंदुत्ववादी शिवसेनेला नष्ट करण्यासाठी ‘अफझल खाना’प्रमाणे विडा उचलला. याचे एकमेव कारण म्हणजे, त्यांना हिंदुत्वाचा गैरफायदा घ्यायचा होता आणि देशात केवळ शिवसेनाच त्यांच्यासमोर निधड्या छातीने उभी राहून जाब विचारू शकते, याची त्यांना भीती होती.

शिवाजी महाराजांच्या तुलनेवरून संताप
अयोध्येतील एका महंताने पंतप्रधान मोदींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. अयोध्येत बसलेल्या एका ‘सागर’ नावाच्या व्यक्तीने मोदींची तुलना शिवरायांशी केली आहे. एवढेच नाही, तर आज जशा ‘ईडी’च्या धाडी पडतात, तशीच तुलना त्यांनी महाराजांच्या सुरतेवरील स्वारीशी केली. हे लोक आता आम्हाला शिवचरित्र शिकवणार का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

तर काशी मथुरा किती लुटतील?
राम मंदिरातील देणगी आणि तिजोरीतील कथित अपहाराची सखोल आणि निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे, अशी ठाम मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि निष्पपक्षपणे चौकशी झाली पाहिजे. नाहीतर चोराला सांगितलं की, तुझ्या चोरीचा तपास तूच लाव, तर चार दिवसांमध्ये यांचा तपासाचा निकाल येईल आणि क्लीन चीट देऊन सगळ्यांना मोकळं टाकून दिलं जाईल. असा टोला त्यांनी लगावला. अयोध्या तो झांकी है, काशी मुथरा बाकी है. मला आता भीती वाटायला लागली, ही अयोध्येची झांकी असेल तर काशी मथुरा किती लुटतील? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !