ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ.यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती
बायपास, व्हॉल्व्ह, जन्मजात हृदयरोग व जटील हृदय शस्त्रक्रिया आता जळगावातच
जळगाव (13 जुलै 2026) : उत्तर महाराष्ट्रातील हृदयरोग उपचार क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे ख्यातनाम हृदय व रक्तवाहिनी शल्यचिकित्सक डॉ.यतीन वाघ यांनी आता डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे आपली सेवा सुरू केली आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक तसेच उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना अत्याधुनिक हृदय शस्त्रक्रिया आणि तज्ज्ञ उपचार आपल्या परिसरातच उपलब्ध होणार आहेत.
हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार
डॉ.यतीन वाघ यांनी मुंबईच्या प्रतिष्ठित लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय येथून कार्डिओ व्हॅस्क्युलर अँड थोरॅसिक सर्जरी ही उच्च पदवी संपादन केली आहे. हृदय शस्त्रक्रिया क्षेत्रातील दीर्घ अनुभवाच्या जोरावर त्यांनी हार्ट अॅण्ड व्हॅस्क्युलर केअर सेंटर आणि श्री विघ्नहर्ता सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत.

उच्च शिक्षणानंतर करिअरच्या अनेक संधी उपलब्ध
उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर महानगरांमध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असूनही त्यांनी आपल्या मातृभूमीत परतण्याचा निर्णय घेतला. उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना महानगरांप्रमाणेच दर्जेदार हृदय उपचार मिळावेत, या ध्येयाने त्यांनी कार्य सुरू केले. सुपरस्पेशालिटी आरोग्यसेवा उभी करताना आवश्यक पायाभूत सुविधा, आधुनिक उपकरणे आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता निर्माण करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.
हृदयविकारांविषयी जनजागृती करण्याबरोबरच अनेक गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रिया यशस्वी करून त्यांनी रुग्णांचा विश्वास संपादन केला.त्यांच्या उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. अमेरिकेतील थोरॅसिक सर्जरी फाऊंडेशन, शिकागो यांच्या प्रत्येक हृदयाचे ठोके महत्त्वाचे – 2020 या उपक्रमात समन्वयक शल्यचिकित्सक म्हणून त्यांची निवड झाली. याशिवाय राष्ट्रीय आरोग्यरत्न पुरस्कार, प्राऊड महाराष्ट्रीयन पुरस्कार यांसह अनेक प्रतिष्ठित सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांच्या सेवेमुळे आता बायपास हृदयाच्या झडपांच्या शस्त्रक्रिया, जन्मजात हृदयरोग, महाधमनी शस्त्रक्रिया तसेच इतर सर्व प्रकारच्या जटिल हृदय शस्त्रक्रिया अत्याधुनिक सुविधांसह उपलब्ध होणार आहेत. अनुभवी कार्डिओलॉजिस्ट, अत्याधुनिक कॅथलॅब, कार्डियाक आयसीयू, आधुनिक ऑपरेशन थिएटर आणि प्रशिक्षित वैद्यकीय पथकाच्या सहकार्याने रुग्णांना सर्वोत्तम सेवा दिली जाणार आहे.
यावेळी डॉ. यतीन वाघ म्हणाले, रुग्णसेवा हीच माझ्यासाठी सर्वात मोठी जबाबदारी आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक रुग्णाला वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि परवडणारे हृदयरोग उपचार मिळावेत, यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार आहे.
गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले की, उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना महानगरांमध्ये जावे लागू नये, यासाठी सर्व सुपरस्पेशालिटी सेवा जळगावमध्ये उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे. डॉ. यतीन वाघ यांच्यासारख्या अनुभवी हृदय शल्यचिकित्सकांच्या सहभागामुळे आमचा कार्डियाक सर्जरी विभाग अधिक सक्षम झाला असून याचा हजारो रुग्णांना लाभ होईल.उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी हृदयविकार उपचारांचे विश्वासार्ह केंद्र म्हणून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अधिक सक्षम झाले असून, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी तज्ज्ञांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण उपचारांची नवी दिशा निर्माण झाली आहे.
