माहेरी निघालेल्या अमळनेरच्या नवविवाहितेचा जळगावात अपघाती मृत्यू : काका गंभीर जखमी
दुचाकीला भरधाव चारचाकी वाहनाने उडवले : दोषीवर कठोर कारवाईची मागणी
Newlywed woman from Amalner dies in accident in Jalgaon while heading to her maternal home; uncle critically injured जळगाव (13 जुलै 2026) : सुखी संसाराची स्वप्ने रंगवत अवघ्या आठवड्याभरापूर्वीच विवाहबद्ध झालेल्या अमळनेर तालुक्यातील 21 वर्षीय विवाहितेचा जळगावात रस्ते अपघातात मृत्यू झाला. या अपघातात विवाहितेचे काका गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी दुपारी विद्यापीठाजवळ घडला. या घटनेने दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. वैशाली भाऊसाहेब पाटील (रा.कोळपिंप्री, ता.अमळनेर) असे मयत विवाहितेचे नाव आहे
आठवडाभरापूर्वीच विवाह
नव्या आयुष्याची स्वप्ने डोळ्यांत घेऊन सासरी आलेल्या 21 वर्षीय वैशाली यांचा विवाह मंगळवार, 7 जुलै रोजी जळगावातील देवराम नगर परिसरातील पोलीस कर्मचारी विजय काशिनाथ पाटील यांच्याशी मोठ्या उत्साहात झाला.
सोमवारी वैशाली यांना माहेरी घेऊन जाण्यासाठी त्यांचे काका जळगावात आले व दुपारचे जेवण झाल्यानंतर दोघेही दुचाकीवरून कोळपिंप्रीकडे रवाना झाले. दुपारी चार वाजेच्या सुमारास विद्यापीठासमोरील रस्त्यावरून जात असताना मागून भरधाव आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने या धडकेत वैशाली यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर काका गंभीर जखमी झाले.
कुटुंबियांची रुग्णालयात धाव
अपघातानंतर दोन्ही कुटुंबीयांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. काही दिवसांपूर्वी ज्या घरात सनई-चौघड्यांचे सूर घुमत होते, अक्षता पडत होत्या आणि आनंदाचे वातावरण होते, तिथे आज केवळ आक्रोश आणि डोळ्यांतील पाणी पाहायला मिळाले. या अपघाताची बातमी समजताच सासरच्या आणि माहेरच्या दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला.
दरम्यान, अपघाताला कारणीभूत ठरलेल्या चारचाकी चालकाला अटक करावी आणि त्याला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी होत आहे.

