महाराष्ट्रात राजपूत समाज आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वीत व्हावे
डॉ.दीपकसिंह राजपूत यांची केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे मागणी
Dr. Deepak Singh Rajput’s request to Union Defence Minister Rajnath Singh जळगाव (मंगळवार, 14 जुलै 2026) : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या वाढदिवसानिमित्त राजपूत समाजाचे युवा नेते डॉ.दीपकसिंह राजपूत यांनी नवी दिल्ली येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रात राजपूत समाज आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वीत व्हावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
विविध विषयांवर चर्चा
यावेळी डॉ.राजपूत यांनी मंत्री महोदयांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. प्रसंगी दोघांमध्ये कौटुंबिक, सामाजिक तसेच विविध राजकीय विषयांवर सविस्तर चर्चा झाली. देशातील सामाजिक ऐक्य, युवकांची भूमिका आणि समाजाच्या विकासासंदर्भातील विविध मुद्यांवरही विचारांची देवाणघेवाण करण्यात आली.

राजपूत समाज आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करा
भेटीदरम्यान डॉ.दीपकसिंह राजपूत यांनी महाराष्ट्रातील राजपूत समाज आर्थिक विकास महामंडळ लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावे, अशी विनंती केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली. या महामंडळाच्या माध्यमातून राजपूत समाजातील युवक, महिला, उद्योजक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना रोजगार, स्वयंरोजगार, व्यवसायासाठी कर्जसुविधा व विविध शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डॉ.दीपकसिंह राजपूत यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत सामाजिक विकासासाठी सुरू असलेल्या सकारात्मक उपक्रमांचे स्वागत केले. या सदिच्छा भेटीमुळे समाजाच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक संवाद साधला गेला असून, महाराष्ट्रातील राजपूत समाजाच्या आर्थिक विकासासंदर्भातील मागणीला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
