आयएफआरएम युफोरिया जळगाव शाखेचा पदग्रहण समारंभ उत्साहात


जळगाव (मंगळवार, 14 जुलै 2026) : इंटरनॅशनल फेलोशिप ऑफ रोटेरियन म्युझिशियन्स ही रोटरी इंटरनॅशनलच्या अंतर्गत कार्यरत संगीतप्रेमी रोटेरियन्सची जागतिक संस्था असून संगीताच्या माध्यमातून फेलोशिप वृद्धिंगत करणे आणि समाजातील सर्व स्तरांतील लोकांना आनंद देणे हे संस्थेचे प्रमुख ध्येय आहे. या संस्थेच्या जळगाव युफोरिया शाखेचा पदग्रहण समारंभ नुकताच रोटरी हॉल, मायादेवी नगरात उत्साहात पार पडला. मावळते अध्यक्ष संदीप जोशी यांनी नूतन अध्यक्ष डॉ.नितीन दावलभक्त यांच्याकडे तर मावळते सचिव डॉ.राहुल पांडे व नेहा नैनानी यांनी नूतन सचिव डॉ.समीर चौधरी यांच्याकडे पदभार सुपूर्द केला.

यांची होती उपस्थिती
समारंभास आयएफआरएमचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष रो.पद्मानाभन अय्यर, महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, प्रख्यात संगीततज्ज्ञ पंडित संजय पत्की तसेच रोटरीचे प्रांतपाल डॉ.राजेश पाटील सपत्नीक प्रमुख उपस्थित होते. यावेळी पंडित संजय पत्की यांनी संगीत साधनेविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तत्पूर्वी मावळते सचिव डॉ.राहुल पांडे यांनी वर्षभरातील उपक्रमांचा आढावा सादर केला. नूतन अध्यक्ष डॉ.नितीन दावलभक्त यांनी आगामी वर्षाची कार्यदिशा मांडली.

पदग्रहणानंतर झालेल्या संगीत मैफिलीत प्रमुख अतिथी व युफोरियाच्या सदस्यांनी बहारदार गीतांनी रसिकांची मने जिंकली. सूत्रसंचालन डॉ.अपर्णा मकासरे, डॉ.अजय शास्त्री, डॉ.मनीषा दावलभक्त यांनी केले, तर आभार डॉ.समीर चौधरी यांनी मानले. कार्यक्रमास युफोरिया सदस्य सहपरिवार, विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !