पोकरा योजनेत भडगाव तालुक्यातील उर्वरित 32 गावांचा समावेश हवा
भडगाव शेतकरी संघटनेचे पाचोरा प्रांताधिकार्यांना निवेदन
The remaining 32 villages of Bhadgaon Taluka should be included in the PoCRA scheme भडगाव (बुधवार, 15 जुलै 2026) : शेतकर्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनामार्फत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) राबविण्यात येत आहे मात्र भडगाव तालुक्यातील 59 गावांपैकी केवळ 27 गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला असून उर्वरित 32 गावे अद्याप वंचित आहेत. या गावांचाही तातडीने समावेश करून तालुक्यातील हजारो शेतकर्यांना योजनेचा लाभ मिळावा, अशी आग्रही मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष अखिलेश पाटील यांनी पाचोरा येथील प्रांताधिकारी भुषण अहिरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
दखल न घेतल्यान प्रांतांना निवेदन
यापूर्वी भडगाव तहसीलदारांना याबाबतचे निवेदन देण्यात आले परंतु याची दखल न घेतल्यामुळे पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी यांच्याजवळ कैफियत मांडण्यात आली.

आर्थिक अस्थितरतेने शेतकरी अडचणीत
भडगाव तालुक्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे. येथील शेतकरी नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ तसेच इतर संकटांवर मात करत मोठ्या कष्टाने शेती करतात. मात्र वाढता उत्पादन खर्च, शेतमालाला न मिळणारा योग्य बाजारभाव आणि सततची आर्थिक अस्थिरता यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पोकरा योजना शेतकर्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याने उर्वरित गावांचा नव्याने समावेश करण्याची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित कृषी यंत्रे, पीक संरक्षक उपकरणे, काढणीपश्चात यंत्रसामग्री, पेरणी यंत्र, कांदा चाळ, शेडनेट, पॉलीहाऊस, फळबाग लागवड, बांबू लागवड, नवीन विहीर, ठिबक व तुषार सिंचन, शेततळे, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, पंप संच व पाईप, शेळीपालन, कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन, रेशीम उद्योग, गांडूळ व सेंद्रिय खत निर्मिती, वृक्ष लागवड, भूजल पुनर्भरण तसेच मृद व जलसंधारण अशा विविध योजनांचा समावेश आहे.
ही गावे योजनेपासून वंचित
भडगाव तालुक्यातील आमडदे, अंजन विहिरे, बांबरुड प्र.ब, बांबरुड प्र.उ, भडगाव, भट्टगाव, बोदर्डे, बोरनार, दलवाडे, घुसर्डी, गिरड गोंडगाव, कनाशी, देव्हारी, कोठली, लोण प्र.भ, लोण प्र. उ, महिंदळे, मांडकी, नावरे, निंभोरा,पळासखेडे, पांढरद, पिंपळगाव, रुपनगर, शिवनी, टोणगाव, वडधे, वाक, वडजी, वाडे, वडगाव, नालबंदी, वलवाडी बु.,वलवाडी खु, वरखेड. इत्यादी गावे या योजनेपासून वंचित आहेत.या सर्व गावांचा पोकरा योजनेत समावेश करावा, अशा मागणीचे निवेदन प्रांत अधिकारी भुषण अहिरे यांना भडगाव शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अखिलेश पाटील, तालुका उपाध्यक्ष वाल्मीक लोखंडे, गुरुदास भालेराव, रामकृष्ण माळी, डॉ. योगेश गोसावी, योगेश पाटील, संजय खैरनार, मनोज पाटील, गौतम अहिरे बंडू कोळी उपस्थित होते.
