मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा जळगाव जिल्हाधिकार्‍यांनी घेतला प्रत्यक्ष आढावा


जळगाव (रविवार, 19 जुलै 2026) : मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रोहन घुगे आणि मतदार नोंदणी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष पाहणी व आढावा घेण्यात आला.

यावेळी 13-जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ अंतर्गत तांबापुरा, सिंधी कॉलनी, दीक्षित वाडी आणि विठ्ठल पेठ या भागांना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रत्यक्ष भेट दिली.


या पाहणीदरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या प्रत्यक्ष कामकाजाची तसेच मतदार नोंदणी प्रक्रियेची बारकाईने तपासणी करण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी यावेळी स्थानिक मतदारांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अंतर्गत सुरू असलेल्या कामांची जागेवरच पाहणी केली.

मतदार नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गतीमान करण्याच्या दृष्टीने उपस्थित अधिकार्‍यांना आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना व आदेश देण्यात आले.

एकही पात्र मतदार सुटणार नाही, यासाठी निवडणूक प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे उपविभागीय अधिकारी विनय गोसावी संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !