अ.भा. मराठी नाट्यपरिषद, जळगाव जिल्हा शाखेतर्फे 25 जुलै रोजी ‘चीज स्लाइस’ या भावस्पर्शी एकपात्री नाट्यप्रयोगाचे आयोजन


जळगाव (सोमवार, 20 जुलै 2026) : दोन पिढ्यांच्या अपेक्षा, जबाबदार्‍या आणि भावविश्वाच्या कात्रीत अडकलेल्या चाळीशीतील ‘सॅण्डविच जनरेशन’च्या मानसिक संघर्षाचे हृदयस्पर्शी चित्रण करणारा ख्यातनाम अभिनेते समीर देशपांडे लिखित व अभिनीत ‘चीज स्लाइस’ हा बहुचर्चित एकपात्री नाट्यप्रयोग जळगावकर रसिकांच्या भेटीला येत आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, जळगाव जिल्हा शाखेतर्फे आयोजित हा नाट्यप्रयोग शनिवार, 25 जुलै 2026 रोजी सायंकाळी सात वाजता केसीई सोसायटीच्या आय.एम.आर. महाविद्यालयातील ऑडिटोरियम हॉल क्र. 10, जळगाव येथे सादर होणार आहे. आधुनिक जीवनशैलीतील नातेसंबंध, जबाबदार्‍या आणि भावनिक द्वंद्व यांचा वेध घेणार्‍या या दर्जेदार नाट्यप्रयोगाचा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आस्वाद घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, जळगाव जिल्हा शाखेतर्फे करण्यात आले आहे.

अभिनेते समीर देशपांडे यांचा समृद्ध अभिनय प्रवास
जळगाव येथे प्राथमिक, माध्यमिक तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंगपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले समीर देशपांडे गेली दोन दशके मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी, नाट्य, दूरदर्शन, जाहिराती आणि वेबसीरिज या विविध माध्यमांत प्रभावी अभिनय करत आहेत.

त्यांनी ‘120 बहादूर’, ‘दृश्यम 2’, ‘खुफिया’, ’सॅटेलाइट शंकर’ आणि ’बुलबुल’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांचे ‘वीर मुरारबाजी’ आणि ‘सेक्शन 84’ हे चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. तसेच ’लाखों में एक’, ’सिटी ऑफ ड्रीम्स’ आणि ‘खोताची वाडी’ या लोकप्रिय वेबसीरिजमधील त्यांच्या अभिनयालाही विशेष दाद मिळाली आहे.

छोट्या पडद्यावर सोनी टीव्हीवरील ’पुण्यश्लोक अहिल्याबाई’ मालिकेत त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या वडिलांची मानकोजी शिंदे ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. याशिवाय स्टार प्लसवरील ’मेहंदी है रचने वाली’, ’क्राइम पेट्रोल’, ’निवेदिता माझी ताई’ तसेच अनेक हिंदी-मराठी मालिकांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या उल्लेखनीय अभिनयासाठी त्यांना दूरदर्शन क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या ‘म. टा. सन्मान’ पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या श्रेणीत नामांकनही प्राप्त झाले आहे.

‘चीज स्लाइस’ हा केवळ एक नाट्यप्रयोग नसून आजच्या मध्यमवयीन पिढीच्या भावविश्वाला स्पर्श करणारा, विचार करायला लावणारा आणि प्रत्येक प्रेक्षकाला स्वतःशी जोडणारा अनुभव ठरणार असल्याची भावना नाट्यप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !