गोंडगाव विद्यालयात ‘श्यामची आई’ एकपात्री नाट्यप्रयोग विद्यार्थ्यांवर संस्कारांचा प्रभावी संदेश


भडगाव (सोमवार, 20 जुलै 2026) : गोंडगाव येथील माध्यमिक विद्यालयात अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, हेलस (ता. मंठा, जि. जालना) आणि स्व. दत्तात्रय हेलसकर विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ अभिनेते महेंद्र वाकोडकर यांचा ‘श्यामची आई’ हा एकपात्री नाट्यप्रयोग उत्साहात सादर करण्यात आला. विद्यार्थ्यांना मातृप्रेम, संस्कार आणि जीवनमूल्यांची जाणीव करून देणार्‍या या प्रयोगाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमात महेंद्र वाकोडकर यांनी साने गुरुजींच्या श्यामची आई या कालजयी साहित्यकृतीतील प्रसंग प्रभावी अभिनयातून साकारले. आईने दिलेली शिकवण हीच मुलांसाठी सर्वोत्तम शिकवण असते. आईचे हृदय प्रेमळ असले तरी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तिला प्रसंगी कठोरही व्हावे लागते, असे सांगत त्यांनी साने गुरुजींच्या मातृहृदयी व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. श्यामच्या बालपणीच्या आठवणी त्यांनी विनोदी आणि हृदयस्पर्शी शैलीत उलगडत विद्यार्थ्यांना आई-वडिलांचा आदर, आज्ञापालन आणि संस्कारांचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या सादरीकरणातील विनोदी प्रसंगांवर विद्यार्थ्यांनी मनमुराद दाद दिली.

मंगळवार, 21 रोजी दुपारी एक वाजता आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. जी. ननावरे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक एस. डी. चौधरी यांनी केले. यावेळी विद्यालयाच्या वतीने महेंद्र वाकोडकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी मुख्याध्यापक बी. जी. ननावरे, एस. डी. चौधरी, आर. एस. देवकर, व्ही. ए. पाटील, एस. आर. पाटील, एस. वाय. पाटील, पी. व्ही. सोळंके, बी. डी. बोरसे, आर. एस. सैंदाणे, एस. आर. महाजन, ए. एम. साळुंखे, लिपिक पी. जे. देशमुख, एस. जी. भोपे, ए. एम. परदेशी, एस. एल. मोरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभियंता ते अभिनेता : प्रेरणादायी प्रवास
महेंद्र वाकोडकर यांचे मूळ गाव कळमनुरी (जि. हिंगोली) असून ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त अभियंता आहेत. बालपणापासूनच नाट्यक्षेत्राची आवड असली तरी कौटुंबिक परिस्थितीमुळे त्यांनी प्रथम अभियंता म्हणून कारकीर्द घडवली. नोकरी सांभाळत त्यांनी नाट्यशास्त्राची पदवीही संपादन केली आणि राज्य नाट्यस्पर्धा तसेच विविध एकांकिका स्पर्धांमध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवला.

मराठी चित्रपट ‘सरीवर सरी’, ‘सप्तपदी’ तसेच हिंदी चित्रपट ‘शिकार’ मध्ये अभिनेता अजय देवगण यांच्यासोबतही त्यांनी काम केले आहे. गेल्या 20 वर्षांपासून ते ‘श्यामची आई’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर करत असून आतापर्यंत दोन हजारांहून अधिक प्रयोग त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संस्कारांची बीजे रुजविणे हेच या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !