दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील पोलिस कारवाईचा जळगावात निषेध : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

जंतर-मंतरवरील लाठीचार्ज प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी ; जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर


जळगाव (बुधवार, 22 जुलै 2026) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज व अश्रुधुराचा वापर केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यात विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि पालकांनी तीव्र आंदोलन केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सरकारच्या शैक्षणिक व विद्यार्थी धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत दिल्लीतील घटनेचा निषेध नोंदविला.

अमानुषपणे लाठीचार्जचा निषेध
आंदोलनकर्ते म्हणाले की, जंतर-मंतर येथे देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांकडून अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला. या कारवाईत अनेक विद्यार्थी, पालक, महिला व विद्यार्थिनी जखमी झाल्याचा दावा करण्यात आला. काही विद्यार्थ्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर काहींशी गैरवर्तन झाल्याचेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले. ही घटना देशाच्या लोकशाही मूल्यांना धक्का देणारी असून, भारतीय इतिहासातील काळा दिवस म्हणून तिची नोंद होईल, अशी तीव्र प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

यानंतर आंदोलनकर्त्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी रोहन बापुराव घुगे यांची भेट घेऊन भारत सरकारला पाठविण्यासाठी निवेदन सादर केले. या निवेदनात विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, तसेच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी भारत सरकार मान्यता प्राप्त अखिल भारतीय ग्राहक संरक्षण संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा.डॉ.विनोद हिंमतराव गायकवाड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील (काका), सामाजिक कार्यकर्ते गजानन मालपुरे, विराज कवडिया, अ‍ॅड.जमील देशपांडे, मनोज पवार, प्रा.राणे सर यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही दिला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !