कोळन्हावी सरपंचाचा दहशतीसाठी हवेत गोळीबार : न्यायालयाने सुनावली कोठडी
यावल (मंगळवार, 1 सप्टेंबर 2026) : यावल तालुक्यातील कोळन्हावी सरपंचांनी डांभूर्णीत भर चौकात गावठी बनावटीच्या कट्ट्यातून दहशतीसाठी हवेत गोळीबार केला होता. या प्रकरणी दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात आली. सुरूवातीला त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर सोमवारी कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. संशयीताची रवानगी भुसावळ कारागृहात करण्यात आली.
काय आहे प्रकरण ?
कोळन्हावी, ता.यावल येथील सरपंच विकास उर्फ गोटू जगन्नाथ सोळंके (37) यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये अवैध देशी दारू विक्री केली जात असल्याचा व्हिडिओ काढल्याच्या रागातून 27 ऑगस्ट रोजी रात्री डांभूर्णीतील चौकात असलेल्या बिर्याणीच्या दुकानाजवळ गावठी बनावटीच्या कट्ट्याने हवेत गोळीबार करीत दहशत निर्माण केली. पोलिसांनी या प्रकरणी त्यांना अटक केली. या प्रकरणी हवालदार हितेश बागुल यांच्या फिर्यादीवरून गोळीबार करणारा सरपंच विकास उर्फ गोटू सोळुंके व गावठी कट्टा पुरवणारा संशयीत रोशन भीमराव सपकाळे (रा.भुसावळ) या दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल केला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मैनोद्दीन सैय्यद करीत आहे.


