केबल वायर्सची चोरी करणारी जळगावसह-सुनसगावातील टोळी जाळ्यात
भुसावळ तालुका पोलिसांची कामगिरी : आठ संशयितांना अटक : गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
भुसावळ (बुधवार, 2 सप्टेंबर 2026) : भुसावळ तालुक्यातील सुनसगाव ग्रामपंचायत हद्दीतील पाणीपुरवठा करणार्या विहिरीवरील विद्युत मोटारची केबल चोरी करणार्या आठ संशयितांना सतर्क ग्रामस्थांनी ताब्यात घेत भुसावळ तालुका पोलिसांनी सूचित केले होते. यंत्रणेने धाव घेत संशयीतांना ताब्यात घेत त्यांना बोलते करताच त्यांनी चोरीच्या उद्देशाने आल्याची कबुली देत 10 हजार रुपये किंमतीची व चार किलो वजनाची तांब्याची तार काढून दिली तसेच 80 हजार रुपये किंमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या. सहा संशयीत सुनसगावचे तर दोघे जळगावातील रहिवासी आहेत. या टोळीच्या अटकेनंतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
काही आहे प्रकरण ?
भुसावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी सुमारे सात वाजता सुनसगाव ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणार्या नदीपात्रातील विहिरीवर मोटार सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी पंकज नथ्थू पाटील गेले असता काही संशयीत मोटारीची केबल वायर चोरी करताना आढळताच त्यांनी गावातील ग्रामस्थांनी माहिती दिली व ग्रामस्थांनी संशयितांना पकडत तालुका पोलिसांना सूचित केले.

आठ संशयीतांना अटक
भुसावळ तालुका पोलिसांनी संशयीत रोहित संजय बोदडे, आकाश एकनाथ सोनवणे, अजय विश्वास खरोटे, रोशन रमेश सपकाळे, मनोज धर्मराज पवार, प्रेम गणेश सोनवणे (सर्व रा.सुनसगाव) तसेच अजीज आझाद खाटीक व हर्षल शरीफ खाटीक (दोघे रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली. या प्रकरणी ईश्वर अंकुश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीतांकडून दहा हजार रुपये किंमतीची तांब्याची तार तसेच 80 हजार रुपये किंमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या. संशयीताच्या अटकेने आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारवाले यांच्या मार्गदर्शनाखाली परिवेक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वात ग्रेडेड उपनिरीक्षक संजय कंखरे, सहायक फौजदार संजय तायडे, पोलीस हवालदार धीरज मंडलिक, उदय नखोले, सचिन पारधी, मनोज पाटील, सुभाष सोनवणे तसेच वाहन चालक इस्तेहाद सैय्यद आदींनी केली.


