दीपनगर उड्डाणपुलावर अपघात : तीन तासांच्या प्रयत्नानंतर चालकाला कॅबिनबाहेर काढण्यात यश


भुसावळ (बुधवार, 2 सप्टेंबर 2026) : गुजरातकडून ओडीसाकडे अवजड लोखंडी पत्रे व साहित्य नेणारा ट्रेलर भुसावळ तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर दीपनगर रेल्वे ओव्हरब्रिजजवळ बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पोहोचल्यानंतर अचानक समोर कार आल्याने चालकाने अपघात टाळण्यासाठी अचानक ‘ब्रेक’ लावले मात्र या कृतीने ट्रेलरमधील मागील पत्रे थेट चालकाच्या कॅबीनवर आदळली. अचानक झालेल्या या अपघातात चालक कॅबीनमध्ये अडकून पडला. भुसावळ तालुका पोलिसांसह नहींचे पथक, क्रेन चालक तसेच लगतच्या ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करीत तीन तासानंतर जखमी चालकाला कॅबीनबाहेर काढले. या चालकावर जळगावातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

तीन तासांच्या प्रयत्नांना यश
गुलगाव, अजमेरस्थित नंदकिशोर लोढा यांच्या ट्रेलर (आर.जे.48 जी.ए.3580) वर चालक रामराज कुमावत (28, कुमावत मोहल्ला, मेहरो कलण केंद्र, केकरी, राजस्थान) आहेत. कुमावत हे गुजरातहून ओडिशाच्या दिशेने पत्रे घेवून निघाल्यानंतर ट्रेलर दीपनगर रेल्वे ओव्हरब्रिजच्या आधी आल्यानंतर अचानक कार समोर आल्याने अपघात टाळण्यासाठी चालकाने अचानक ब्रेक लावला मात्र यावेळी लादलेले लोखंडी पत्रे पुढे सरकून थेट कॅबीनमध्ये आदळले व या अपघातात चालक कॅबीनमध्ये अडकला. चालकाचा कंबरेखालील भाग पूर्णपणे अडकला तर पायामध्ये लोखंडी रॉड अडकल्याने त्याला बाहेर काढणे अत्यंत आव्हानात्मक बनले.


भुसावळ तालुका पोलिसांची धाव
अपघातानंतर भुसावळ तालुक्याचे परिवेक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्यासह सहाय्यक फौजदार संजय तायडे, योगेश पालवे, सचिन पारदे, उदयन अकोले, इस्तियाक शेख तसेच वाहतूक शाखेचे कर्मचारी रफिक तडवी आदी दाखल झाले. पोलिसांनी बचावकार्याला मदत करण्याबरोबरच महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली

अपघातानंतर वाहतूक ठप्प
या भीषण अपघातामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर वाहतुकीची मोठी कोंडी झाली. अपघातग्रस्त ट्रक आणि बचावकार्यामुळे महामार्गावर सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. चालक कुमावतला सुरूवातीला ट्रामा सेंटरला हलवण्यात आल्यानंतर अधिक उपचारार्थ जळगावातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !