सत्य निकेतनमध्ये पाच मजली इमारत जमीनदोस्त : दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, अनेक जण ढिगार्‍याखाली अडकल्याची भीती

बेसमेंटमध्ये सुरू होते अनधिकृत खोदकाम ; मालकाविरोधात गुन्हा दाखल, एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू


नवी दिल्ली (रविवार, 6 सप्टेंबर 2026) : देशाची राजधानी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या गजबजलेल्या सत्य निकेतन परिसरात रविवारी काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना घडली. तब्बल 40 ते 50 वर्षे जुनी पाच मजली इमारत अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या इमारतीत दिल्ली विद्यापीठासह विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी पेइंग गेस्ट म्हणून राहत होते. दुर्घटनेत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून अनेक जण ढिगार्‍याखाली अडकल्याची भीती आहे. अग्निशमन दल, दिल्ली पोलीस आणि एनडीआरएफकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, इमारतीच्या बेसमेंटमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत दुरुस्ती आणि खोदकामामुळे पाया कमकुवत झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे.

दोघांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती
घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशामक दल, स्थानिक पोलीस आणि एनडीआरएफच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. ढिगार्‍याखालून बाहेर काढण्यात आलेल्या 7 जखमींना तातडीने एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले, त्यापैकी 2 विद्यार्थ्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, या 5 मजली इमारतीत 20 ते 25 खोल्या होत्या आणि प्रत्येक खोलीत 2-2 विद्यार्थी राहत होते. इमारत कोसळली तेव्हा 50 पेक्षा जास्त विद्यार्थी आत उपस्थित होते. आतापर्यंत 9 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

ढिगार्‍याखालून मदतीचा व्हिडीओ
ढिगार्‍याखाली दबलेल्या एका विद्यार्थ्याने मोबाईलवरून स्वतःचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर करत ‘मला वाचवा’ अशी आर्त हाक दिली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या त्याच्या मित्राने सांगितले की, तो ढिगार्‍याखालून फोन करून सातत्याने मदतीची याचना करत होता.

मालक आनंद बन्सलविरोधात गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळमजल्यावरील बेसमेंटमध्ये सुरू असलेल्या निष्काळजी दुरुस्तीच्या कामामुळेच हा मोठा अपघात घडल्याचा प्राथमिक संशय आहे. इमारतीचा मालक आनंद बन्सल (रा. गुरुग्राम) याच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी निष्काळजीपणा आणि मानवी जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. इमारत 40 ते 50 वर्षे जुनी असतानाही कोणत्याही सुरक्षेच्या नियमांचे पालन न करता बेसमेंटमध्ये खोदकाम सुरू होते. त्यामुळे पाया कमकुवत होऊन अख्खी 5 मजली इमारत कोसळल्याचे निष्पन्न झाले आहे.

गृहमंत्री अमित शाहंकडून घटनेची गंभीर दखल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट करत शोक व्यक्त केला. त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त आणि एनडीआरएफच्या महासंचालकांशी थेट फोनवरून चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आणि मदतकार्य अधिक वेगवान करण्याचे निर्देश दिले.

विद्यार्थ्याचा जीव अमूल्य’ – राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तीव्र चिंता व्यक्त करत म्हटले, महाविद्यालयांमध्ये पुरेशी वसतिगृहे नसल्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच छताखाली 40-40 च्या संख्येने अशा अमानवी आणि असुरक्षित पीजीमध्ये राहावे लागते. विद्यार्थ्यांचे आयुष्य आधीच संघर्षाचे असते, त्यात आता ही परिस्थिती जीवघेणी बनली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा जीव मौल्यवान असून मदत पथकांनी प्रत्येकापर्यंत पोहोचावे.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !