धडगाव पोलिसांचा गांजा शेतीवर सर्जिकल स्ट्राईक : 1.05 कोटींचा मुद्देमाल जप्त
धडगाव (रविवार, 6 सप्टेंबर 2026) : धडगाव पोलिसांनी गेंदा शिवारातील डोंगराळ भागात धडक कारवाई करत बेकायदेशीररीत्या लागवड केलेली गांजाची शेती उद्ध्वस्त केली. या कारवाईत 210 किलो 340 ग्रॅम हिरवी ओली गांजाची झाडे जप्त करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार या मुद्देमालाची किंमत एक कोटी 5 लाख 17 हजार रुपये असून एका संशयीताला अटक करण्यात आली.
गुप्त माहितीच्या आधारे छापा
धडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांना गुप्त बातमीदारामार्फत गेंदा गावाच्या शिवारातील डोंगर भागात वनपट्ट्याच्या शेतात गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याची माहिती मिळाली. माहितीची खात्री झाल्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने पोलीस निरीक्षक भाबड हे राजपत्रित अधिकारी म्हणून उपस्थित राहिले आणि पंचांसह पोलिसांचे पथक तयार करून गेंदाचा उबरपाडा येथील शेतावर छापा टाकण्यात आला.
210 किलोहून अधिक गांजा जप्त
छाप्यावेळी आलशा मालसिंग पावरा (40, रा.गेंदाचा उबरपाडा, ता.धडगाव, जि.नंदुरबार) हा शेतात गांजाच्या झाडांची लागवड व जोपासना करताना आढळून आला. पोलिसांनी शेतातून मुळासकट उपटलेली 3 ते 5 फूट उंचीची गांजाची झाडे जप्त केली. एकूण 14 पांढर्या कापडाच्या गठ्ठ्यांमध्ये 210 किलो 340 ग्रॅम गांजाची झाडे पंचांसमक्ष जप्त करून सीलबंद करण्यात आली. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील भाबड, उपनिरीक्षक विशाल सोनवणे, हवालदार शिवलाल गुजन्या पावरा, सुभाष बापू तमखाने, विश्वजीत प्रतापसिंग चव्हाण, मनीष रामसिंग पावरा, अशोक उत्तम पाडवी, किरण सुरेश भील, दीपक मालचे, जलसिंग वाडग्या वसावे, किरण डिगंबर पाडवी, मानसिंग होमा वळवी, प्रशांत यादव, चालक नाईक सुनीलकुमार बाळू सूर्यवंशी आदींच्या पथकाने केली.

