वरणगावात प्रेमविवाहाच्या कारणावरून तरुणावर चाकूहल्ला : तिघांना अटक

लोखंडी रॉड व धारदार चाकूने वार केल्या केल्याचा आरोप ; आठ संशयीतांविरोधात गुन्हा


वरणगाव (बुधवार, 14 ऑक्टोबर 2026) : प्रेम विवाह केल्याच्या वादातून वरणगाव शहरातील तरुणावर आठ संशयीतांनी चाकूसह लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना 12 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास सिद्धेश्वर नगराजवळील कमानीजवळ घडली. या प्रकरणी आठ संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

प्रेमविवाहाच्या कारणावरून वाद
वरणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाळ संजय माळी (24, सिद्धेश्वरनगर, वरणगाव, ता. भुसावळ, जि. जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या प्रेमविवाहाच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. याच कारणातून सोमवार, 12 ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास वरणगावातील सिद्धेश्वरनगर परिसरात संशयीतांनी फिर्यादीचा भाऊ कृष्णा संजय माळी याच्यावर लोखंडी रॉड तसेच चाकूने हल्ला करीत त्यास ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.






आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल : तीन अटकेत
या प्रकरणी गोपाळ माळी यांच्या तक्रारीवरून सोपान पंडित धनगर, पवन संजय धनगर, धीरज संजय धनगर, निर्मलाबाई बापू धनगर, मिराबाई संजय धनगर, सागर बापू धनगर, मयूर भागवत धनगर व निलेश राखुंडे (सर्व रा.वरणगाव, ता.भुसावळ, जि. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सागर, पवन व धीरज यास अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तपास सहा.निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहेत.

दुसर्‍या गटाच्या तक्रारीवरून चौघांविरोधात गुन्हा
दरम्यान, दुसर्‍या गटातर्फे पवन संजय धनगर (23, सिद्धेश्वर नगर) यांच्या फिर्यादीवरून हर्षल राजपूत, कृष्णा संजय माळी, गोपाळ संजय माळी, शुभांगी गोपाळ माळी (सर्व रा.सिद्धेश्वर नगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीतांनी फिर्यादीसह त्यांच्या भावाला फायटरने तसेच स्टील कड्याने मारहाण केली तसेच तक्रारदाराच्या आईला शिविगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. तपास ग्रेडेड उपनिरीक्षक रियाज शेख करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !