एक लाखांची लाच घेताना मानेगावच्या ग्रामसेवकासह दोघे जाळ्यात

सेवानिवृत्त माजी सैनिकाकडून मागितली लाच : दाम्पत्यावरील कारवाईने लाचखोर हादरले


गोंदिया (बुधवार, 14 ऑक्टोबर 2026) : माजी सैनिकाला शासनाकडून पाच एकर शेती मिळवून देण्यासाठी आवश्यक ग्रामपंचायतीचे ठराव आणि ना हरकत प्रमाणपत्राची (एनओसी) कागदपत्रे तयार करून देण्याच्या स्वतःसाठी एक लाखांची लाच मागून ती स्वीकारताना मानेगाव, ता.आमगाव येथील ग्रामसेवक उषा जयकृष्ण पाटील (42) व त्यांचे पती तथा पंचायत समिती सालेकसाचे विषय साधन व्यक्ती रमाकांत ग्यानीराम मोटघरे (54) या दाम्पत्याला गोंदिया एसीबीने अटक केल्याने लाचखोर हादरले आहेत. ही कारवाई मंगळवार, 13 ऑक्टोबर रोजी करण्यात आली.

नेमके प्रकरण काय?
तक्रारदार हे 48 वर्षीय सेवानिवृत्त सैनिक आहेत तर माजी सैनिक म्हणून शासनाकडून पाच एकर शेती मिळविण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी, गोंदिया यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावासंदर्भात ग्रामपंचायतीचे ठराव आणि ना हरकत प्रमाणपत्राची कागदपत्रे तयार करून देण्यासाठी संबंधित आरोपींनी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या नावाने पाच लाख 50 हजार रुपयांची लाच मागिली तसेच काम सुरू करून देण्यासाठी स्वतःसाठी स्वतंत्र एक लाख रुपये देण्याची मागणी केली.






9 रोजी घरातच मागितली लाच
तक्रारदाराने 9 ऑक्टोबर 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथे तक्रार दिल्यानंतर याच दिवशी पंच आणि व्हॉइस रेकॉर्डरच्या मदतीने लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. यावेळी आरोपींनी तक्रारदाराचे काम करून देण्यासाठी सरपंच व सदस्यांच्या नावाने पाच लाख 50 हजार रुपये आणि काम सुरू करण्यासाठी स्वतःसाठी स्वतंत्र एक लाख रुपयांची मागणी त्यांच्याच घरी केल्याचे निष्पन्न झाले. ठरल्यप्रमाणे 13 ऑक्टोबर लाच रक्कम स्वीकारण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने आरोपींचे घर गाठले असता महिला ग्रामसेविकेने पतीकडे लाचेचे एक लाख रुपये देण्याचा इशारा केल्यानंतर लाच स्वीकारताच पथकाने त्यांना अटक केली. गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

एसीबीच्या पथकाची कारवाई
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अरविंद राऊत, पोलीस निरीक्षक उमाकांत उगले यांच्यासह हवालदार बोहरे, हवालदार कहालकर, शेंडे, बोपचे, काटकर, सोनवणे, बाटबर्वे, पटले, डांगे आदींच्या पथकाने केली.

लाच मागितल्यास तक्रार करण्याचे आवाहन
शासकीय कामासाठी कोणताही लोकसेवक लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !