500 कोटींच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ ! शिंदें म्हणाले, दूध का दूध, पानी का पानी होऊ द्या’


मुंबई (बुधवार, 21 ऑक्टोबर 2026) : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून चर्चेत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराचा मुद्दा उपस्थित केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या आरोपांवर शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत कथित व्यवहाराशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. ‘मी 500 कोटी रुपये कोणाला दिलेही नाहीत आणि कोणाकडून घेतलेही नाहीत. आरोप करण्यापूर्वी शहानिशा करायला हवी होती. पुरावे असतील, तर संबंधित यंत्रणांकडे द्या,’ असे थेट आव्हान त्यांनी जरांगे यांना दिले. दुसरीकडे, या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय शांत बसणार नसल्याची भूमिका जरांगे यांनी घेतल्याने आरोप-प्रत्यारोपांचा हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.

शिंदेंचा स्पष्ट इन्कार; जरांगेंना पुरावे सादर करण्याचे आव्हान
नारायणगडावरील दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराचा उल्लेख करत एकनाथ शिंदे यांच्यावर प्रश्न उपस्थित केले होते. शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला 500 कोटी रुपये दिल्याची चर्चा भाजपमध्ये असल्याचा दावा जरांगे यांनी केला होता. तसेच, या संदर्भात शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांना नेमके काय सांगितले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, मी 500 कोटी रुपये कोणाला दिलेले नाहीत आणि कोणाकडून घेतलेलेही नाहीत. देण्याचा प्रश्नच येत नाही. मनोज जरांगे पाटील ज्या आधारावर बोलत असतील, तर त्यांनी आधी त्याची शहानिशा करायला हवी होती. त्यांच्याकडे काही पुरावे असतील, तर त्यांनी ते सादर करावेत.






शिंदे यांनी केले भूमिकेचे स्वागत
जरांगे यांनी पुरावे सादर करण्याची तयारी दर्शविल्याचे पत्रकारांनी सांगितल्यानंतर शिंदे यांनी या भूमिकेचे स्वागत केले. संबंधित यंत्रणांकडे पुरावे सादर करून चौकशी झाली पाहिजे आणि सत्य जनतेसमोर आले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांना संपूर्ण महाराष्ट्र आणि देश ओळखतो. माझ्या कामाची पद्धत सर्वांना माहीत आहे. अनेक जण माझे नाव घेऊन प्रसिद्धी मिळवण्याचा आणि हेडलाईन करण्याचा प्रयत्न करतात, अशी टीकाही त्यांनी केली.

‘मराठा समाजाचे काम करा, राजकीय व्यासपीठ बनवू नका’
500 कोटींच्या आरोपांना उत्तर देतानाच शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवरही भाष्य केले. जरांगे हे मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी आंदोलन करत असल्याने आपण मुख्यमंत्री असताना समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी सांगितले. शिंदे म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांच्या सरकारने विविध निर्णय घेतले. कुणबी प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया, आरक्षणासंदर्भातील निर्णय आणि 5,300 जणांना अधिसंख्य पदांवर नोकर्‍या देण्यासारखी पावले उचलण्यात आली. मराठा समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीने सरकारने काम केल्याचा दावाही त्यांनी केला.

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी किंवा अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लावलेला नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या प्रक्रियेला सुरुवात झाली होती आणि आरक्षण टिकविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. जरांगे यांनी समाजाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे आणि आंदोलनाचा वापर राजकीय व्यासपीठ म्हणून करू नये, असे आवाहनही शिंदे यांनी केले.

संजय राऊतांवर शिंदेंचा हल्लाबोल
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत केलेल्या विधानावरूनही एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर आरोप केले की त्याला माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळते, असा टोला शिंदे यांनी लगावला. विरोधकांकडे स्वतःचा राजकीय कार्यक्रम नसल्याची टीका करत त्यांनी दुसर्‍यांच्या व्यासपीठावर जाऊन आरोप करण्याच्या प्रवृत्तीवर प्रश्न उपस्थित केले. सत्ता कोणाच्या हातात द्यायची आणि कोणाला सत्तेतून खाली उतरवायचे, हे जनता ठरवते. त्यासाठी जनतेमध्ये जाऊन काम करावे लागते. घरात बसून सत्ता परिवर्तन होत नसते, असे ते म्हणाले.

आता पुढे काय ?
500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहारावरून सुरू झालेल्या या वादात एका बाजूला जरांगे यांचे दावे, तर दुसर्‍या बाजूला शिंदे यांचा स्पष्ट इन्कार आहे. त्यामुळे जरांगे कोणते पुरावे सादर करतात, संबंधित यंत्रणा या प्रकरणाची दखल घेतात का आणि या आरोपांमधून नेमके काय निष्पन्न होते, याकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !