500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपने महाराष्ट्रात खळबळ ! राज ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल ! निष्पक्ष चौकशीसह कारवाईची मागणी

‘हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच’ ; क्लीपच्या सत्यतेसह चौकशीची मागणी


मुंबई (शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2026) : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या 500 कोटी रुपयांच्या कथित देवाण-घेवाणीच्या ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. ‘हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच’, अशा तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर दोन प्रमुख मागण्या मांडल्या. ऑडिओ क्लिपची सत्यता तपासण्याबरोबरच त्यामध्ये कथितरीत्या झालेल्या चर्चेचीही सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी त्यांची भूमिका आहे.

काय आहे कथित ऑडिओ क्लिप प्रकरण?
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत 500 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक व्यवहाराचा उल्लेख असलेली ऑडिओ क्लिप ऐकवली. या क्लिपमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सत्ताधारी पक्षाशी संबंधित काही व्यक्तींच्या कथित संभाषणावरून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या क्लिपमध्ये माध्यमांवर प्रभाव टाकणे, राजकीय मुद्द्यांवरील जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवणे आणि धार्मिक ध्रुवीकरणासंदर्भातील चर्चेचे दावेही करण्यात येत आहेत मात्र या क्लिपमधील संभाषणाची सत्यता आणि त्यातील आरोपांची वस्तुस्थिती अद्याप स्वतंत्रपणे सिद्ध झालेली नाही त्यामुळे या प्रकरणात तांत्रिक तपास आणि निष्पक्ष चौकशीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

‘फक्त फॉरेन्सिक तपास पुरेसा नाही’
राज ठाकरे यांनी समाजमाध्यमांवरील पोस्टमधून या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या चर्चेत असलेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये केवळ 500 कोटी रुपयांच्या व्यवहाराचाच मुद्दा नाह तर राजकीय प्रचार, समाज माध्यमांचा वापर, माध्यमांवर दबाव आणण्याचे कथित प्रयत्न आणि भावनिक मुद्द्यांच्या माध्यमातून जनतेचे लक्ष वळवण्यासंदर्भातील चर्चेचे दावेही आहेत. या प्रकरणातील प्रत्येक पैलूची तपासणी होणे आवश्यक असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. केवळ ऑडिओ क्लिपची तांत्रिक सत्यता तपासून थांबू नये, तर त्यातील संभाषणातून समोर येणार्‍या गंभीर प्रश्नांचीही चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लिपच्या फॉरेन्सिक तपासणीचे आदेश दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी तपासाच्या निष्पक्षतेवर भर दिला. क्लिपमधील आवाज, संभाषणाची सत्यता आणि त्यासंदर्भात उपलब्ध पुराव्यांची पडताळणी व्हावी; तसेच या प्रकरणात कोणाची भूमिका संशयास्पद आढळल्यास नियमानुसार कारवाई व्हावी, असे त्यांनी सूचित केले.

‘तुमच्या पाठीमागे काय सुरू होते, तेही तपासा’
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हटले की, ऑडिओ क्लिपमधील संभाषण गंभीर स्वरूपाचे असल्याचे लक्षात घेऊन त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. केवळ क्लिप खरी आहे की खोटी, एवढ्यापुरती तपासाची व्याप्ती मर्यादित राहू नये. या कथित संभाषणात जे मुद्दे समोर येत आहेत, त्याबाबत सरकारला आधीपासून काही माहिती होती का, संबंधित व्यक्तींमध्ये नेमकी काय चर्चा झाली आणि त्यातून काही गैरप्रकार घडले आहेत का, याचाही तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली.

क्लिप दोन वर्षांपूर्वीची असल्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रश्न
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कथित ऑडिओ क्लिपच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ही क्लिप साधारण दोन वर्षांपूर्वीची असण्याची शक्यता असून ती आता सार्वजनिक का झाली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी क्लिप बाहेर कशी आली आणि ती कोणी सार्वजनिक केली, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याबरोबरच क्लिपमध्ये कथितरीत्या झालेल्या संभाषणातील मुद्यांचीही चौकशी होणे गरजेचे असल्याचे म्हटले. क्लिप कधीची आहे आणि ती आता का समोर आली, यावरच चर्चा केंद्रित न ठेवता त्यातील आरोपांची सत्यता तपासावी, अशी त्यांची भूमिका आहे. तांत्रिक तपासाच्या प्रक्रियेच्या नावाखाली मूळ मुद्द्यांपासून लक्ष विचलित होता कामा नये, असा इशाराही त्यांनी दिला.

शिंदे सेनेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांची भेट
दरम्यान, गुरुवारी रात्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात सायबर यंत्रणा आणि फॉरेन्सिक प्रयोगशाळेच्या माध्यमातून तपासणी करण्यात यावी, अशी मागणी या भेटीदरम्यान करण्यात आल्याचे वृत्त आहे.

राज ठाकरेंच्या मुख्यमंत्र्यांकडे दोन प्रमुख मागण्या
पहिली मागणी : कथित ऑडिओ क्लिपची सायबर आणि फॉरेन्सिक यंत्रणेमार्फत निष्पक्ष तपासणी करून संभाषणाची सत्यता निश्चित करावी.
दुसरी मागणी : क्लिपमध्ये कथितरीत्या झालेल्या चर्चेतील आर्थिक व्यवहार, माध्यमांवरील दबाव आणि राजकीय हेतूंसंदर्भातील आरोपांची सखोल चौकशी करून दोषी आढळणार्‍यांवर योग्य ती कारवाई करावी.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !