थोरगव्हाणच्या डी.एस.देशमुख विद्यालयात सांघिक सांस्कृतिक कार्यक्रमांतून कला, संस्कृती आणि सामाजिक प्रबोधनाचा जागर !

175 बालकलाकारांचा सहभाग; 42 कार्यक्रमांतून अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण संवर्धन, जलसंवर्धन व स्त्रीशिक्षणाचा संदेश


थोरगव्हाण, ता.रावेर (शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2026) : डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सव व दुर्गोत्सवानिमित्त आयोजित विविध गुणदर्शन व सांघिक सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवार, 22 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता उत्साहात संपन्न झाला. विद्यालयातील सुमारे 175 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी 42 विविध कार्यक्रमांतून कला, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक प्रबोधनाचा अनोखा संगम सादर केला. तब्बल पाच तास चाललेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक, माता-भगिनी आणि माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यांची होती उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून वाघोदा, मुक्काम जळगाव येथील तुकाराम रावजी चौधरी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शालेय समिती सदस्य चंद्रकांत सुराजी पाटील होते. यावेळी संस्थेचे प्रतिनिधी नंदकुमार चौधरी व मधुकर कोल्हे, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष मनोज वाघ, तसेच विजय पुरुषोत्तम चौधरी, अमोल चक्रे, सुरेश ठाकरे, , गणेश ठाकरे आणि माता-पालक सदस्य उपस्थित होते.

लोककला, भक्तिगीत आणि सांस्कृतिक परंपरेचा आविष्कार
सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने झाली आई अंबेच्या जागराने, ‘उदो उदो अंबाबाईचा’ या गोंधळगीताने आणि श्री गणेशाच्या आराधनेने झाली. ‘धरतीवरी भक्ता घरी आनंद झाला’ या सुप्रसिद्ध गीतासह विविध भक्तिगीते, बहारदार सिनेमागीते, देशभक्तिपर गीते, सांघिक नृत्ये आणि रेकॉर्ड डान्स यांनी उपस्थितांची मने जिंकली.

‘शाळा मराठी, माझी शाळा मराठी’ या सादरीकरणातून मराठी भाषेचा अभिमान व्यक्त करण्यात आला तर ‘सावित्री तू शिक’ या बालनाटिकेतून स्त्रीशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. साक्षरता प्रबोधन, हास्य-विनोदाच्या नाट्यछटा, ‘वासुदेव आला हो, वासुदेव आला’ आणि ‘दाती घ्या, कुंकू मणी घ्या’ यांसारख्या लोककलात्मक सादरीकरणांनी ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविले. भारुडातील ‘विंचू चावला’ आणि ‘कडकलक्ष्मी आली’ या सादरीकरणांनी लोकपरंपरेची रंगत वाढविली.

सामाजिक प्रबोधनासह वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संदेश
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित रेकॉर्ड नृत्य व सांघिक गीत गायन -नृत्य सादर करून गीताच्या माध्यतून त्यांच्या महान कार्याचा गौरव करण्यात आला. सामाजिक प्रश्नांवर आधारित भक्ताची नक्कल आणि रेकॉर्ड नक्कल यांसारख्या सादरीकरणांतून अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कला आणि मनोरंजनाबरोबरच पर्यावरण संवर्धन, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याचे उपाय, ‘पाणी वाचवा’, ‘मुलीला शिकवा’, साक्षरता आणि सामाजिक समता अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे जनजागृती केली. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा आणि समाजप्रबोधन करणारा ठरला.

परीक्षण समितीकडून कार्यक्रमांचे मूल्यमापन; विद्यार्थ्यांना बक्षिसे
सुमारे 42 कार्यक्रमांचे परीक्षण के. पी. चौधरी, पी. सी. कचरे, सौ. नयना ज्ञानेश्वर पाटील आणि एन. ए. देशमुख यांच्या परीक्षण समितीने निश्चित केलेल्या निकषांनुसार करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातील कलात्मकता, विषयाची मांडणी, अभिनय, नृत्यकौशल्य आणि सामाजिक संदेश यांचा विचार करून कार्यक्रमांचे मूल्यमापन करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पालक, शिक्षक, उपस्थित माता-भगिनी आणि माजी विद्यार्थ्यांकडून बक्षिसे देण्यात आली. बक्षिसांच्या नोंदी व लेखनाचे कार्य कलाशिक्षक एस. बी. सपकाळे आणि एस. पी. पाटील यांनी केले.

प्रमुख पाहुणे तुकाराम रावजी चौधरी यांनी मनोगत व्यक्त करून सर्व कार्यक्रमांसाठी 2,100 रुपयांचे बक्षीस दिले, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत सुराजी पाटील यांनी 4,200 रुपयांचे बक्षीस देऊन बालकलाकारांचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ
प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.के.पाटील यांनी केले. ज्येष्ठ शिक्षक वाय.जे कुरकुरे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविणे आणि सामाजिक जाणिवा विकसित करणे, हा अशा उपक्रमांचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारांतून केलेले सादरीकरण त्यांच्या सुप्त कलागुणांचे दर्शन घडविणारे ठरले. सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख एम.के.पाटील यांनी तर के.एम.पाटील आणि वाय.जे कुरकुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

संस्थेच्या पदाधिकार्‍यांकडून अभिनंदन
या सांघिक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल दी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जनार्दन चौधरी, उपाध्यक्ष उमाकांत वसंत बाऊंस्कर, सचिव पवन हेमंत चौधरी, सहसचिव रामराव माधवराव देशमुख तसेच कार्यकारी मंडळाने विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, सांस्कृतिक समिती आणि सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !