श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाची गोंदवले-सज्जनगड-नरसोबाची वाडी धार्मिक यात्रा आनंदात
भक्ती, अध्यात्म, सहवास आणि सेवाभावाचा अविस्मरणीय अनुभव
भुसावळ (गुरुवार, 29 ऑक्टोबर 2026) : शहरातील श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने 22 ते 26 ऑक्टोबर 2026 या कालावधीत श्रीमती अलका ढाके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली पाच दिवसीय धार्मिक यात्रा अत्यंत आनंददायी, भक्तिमय आणि संस्मरणीय वातावरणात झाली. या यात्रेत विविध धार्मिक व ऐतीहासीक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत सभासदांनी अध्यात्मिक समाधानासोबतच परस्परांच्या सहवासाचा आनंद अनुभवला.
श्री मयूरेश्वर गणपतीचे दर्शन
यात्रेची सुरुवात मोरगावातील श्री मयूरेश्वर गणपतीच्या दर्शनाने झाली. त्यानंतर जेजुरी गडावर खंडोबा महाराजांचे दर्शन घेऊन सर्वांनी भक्तिभावाने येळकोट येळकोट जय मल्हार! असा जयघोष केला. पुढे सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींच्या समाधीचे दर्शन आणि चाफळ येथे राम मंदिराचे घेऊन त्यांच्या श्रीरामभक्तीच्या परंपरेचे स्मरण करण्यात आले. या पवित्र स्थळांच्या दर्शनाने यात्रेची सुरुवात मंगलमय झाली.
यानंतर श्रीक्षेत्र गोंदवले येथे तीन दिवसांचा मुक्काम होता. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधीचे आणि श्रीराम मंदिराचे दर्शन आणि सकाळी पाच वाजता काकड आरती आनंद ,नामस्मरण ध्यान मंदिर सर्व सभासदांना मनःशांती आणि आध्यात्मिक समाधान लाभले. येथील निवास, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था अत्यंत उत्कृष्ट होती. या सर्व व्यवस्थेमध्ये ठाकूर मामा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या मदतीमुळे मुक्काम सुखकर आणि आनंददायी झाला. त्यांच्याप्रती सर्व सभासदांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यात्रेदरम्यान शिखर शिंगणापूर येथील महादेवाचे दर्शन घेण्यात आले. त्यानंतर पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी सुमारे सहा तास प्रतीक्षा करावी लागली. दीर्घ प्रतीक्षेमुळे काहीसा थकवा जाणवत होता; मात्र विठोबा माऊलीचे दर्शन होताच सर्वांचा थकवा जणू दूर झाला. भक्तिभावाने घेतलेल्या दर्शनानंतर प्रत्येकाच्या चेहर्यावर समाधान आणि आनंद झळकत होता. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम! या नामघोषाने वातावरण भक्तिमय झाले.
पुढील प्रवासात वनबाग येथील पट्टशिष्य श्री ब्रह्मानंद महाराजांच्या समाधिस्थानाचे दर्शन घेण्यात आले तसेच नरसोबाची वाडी येथे कृष्णा नदीच्या पवित्र तीरावर श्री दत्तगुरूंचे दर्शन घेऊन सर्व सभासद तृप्त झाले. नदीकाठचा शांत परिसर, मंदिरातील प्रसन्न वातावरण आणि दत्तनामाचे स्मरण यांमुळे यात्रेतील आध्यात्मिक आनंद द्विगुणित झाला. कोपेश्वर महादेव मंदिर प्राचीन शिव मंदिर, उत्कृष्ठ दगडी कलामत्क नक्षीकाम शिल्प, अप्रतिम वास्तू रचना आणि शंकर आणि विष्णू यांचे दर्शन झाले.
ही यात्रा केवळ तीर्थदर्शनापुरती मर्यादित नव्हती तर ज्येष्ठ सभासदांना दैनंदिन जीवनातील धावपळ आणि तणावापासून दूर जाऊन आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी देणारी ठरली. एकत्र प्रवास, सामूहिक प्रार्थना, नामस्मरण, हास्यविनोद आणि परस्परांतील आपुलकी यांमुळे सर्वांच्या मनात अविस्मरणीय आठवणी निर्माण झाल्या. यात्रेतील सर्व सहभागी सभासदांनी एकमेकांना सहकार्य केले. सर्वांचे स्वास्थ्य चांगले राहिले आणि सर्वजण सुखरूप घरी परतले, हीच सर्वांत मोठी आनंदाची बाब ठरली. यामागे श्री गोंदवलेकर महाराजांची कृपा असल्याची भावना सभासदांनी व्यक्त केली.
यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
यात्रेच्या यशस्वीतेसाठी जी.आर.ठाकूर मामा, अध्यक्षा अलका ढाके, सचिव गजानन सेवलकर, कोषाध्यक्ष अशोक निकम, संघाचे पदाधिकारी आणि सर्व सहभागी सभासदांनी परिश्रम घेतले.