खरीप पीक पेरा खोळंबल्याने पीक विम्याची मुदत वाढवा
राष्ट्रवादी युवती काँग्रेसची कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे आग्रही मागणी
जळगाव (शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026) : ऑनलाईन प्रणालीतील तांत्रिक त्रृटींमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांच्या खरीप पिकांच्या नोंदी खोळंबल्या आहेत. परिणामी, पीकविमा योजनेचा अर्ज भरताना शेतकर्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून, मुदतीत अर्ज न भरल्यास विम्याच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. ही समस्या तातडीने सोडवून पीकविमा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष कु. भाग्यश्री विवेक ठाकरे यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांची मंत्रालयात भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.
पीक अर्ज भरताना अडचणी
पीकविमा अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर असल्याने शेतकर्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. ऑनलाइन प्रणालीत पीकपेरा नोंदी उपलब्ध नसल्यामुळे अनेक शेतकरी अद्याप खरीप पिकांची नोंदणी करू शकलेले नाहीत. त्यातच सेतू सुविधा केंद्रांवरही पीकविम्याचे अर्ज भरताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी शेतकर्यांकडून होत आहेत. एका बाजूला नैसर्गिक संकटांचा सामना करणार्या शेतकर्यांना दुसर्या बाजूला तांत्रिक अडचणींमुळे शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

शेतकर्यांना द्यावा दिलासा
महसूल आणि कृषी विभागामध्ये समन्वय साधून पीकपेरा नोंदी तातडीने अद्ययावत कराव्यात, ऑनलाईन प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात आणि शेतकर्यांना विनाअडथळा पीकविमा अर्ज भरता येईल, अशी व्यवस्था करावी. तसेच अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देऊन शेतकर्यांना दिलासा द्यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कृषी विभागाने तातडीने समन्वय साधावा
कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकार्यांची समन्वय बैठक घेऊन पीकपेरा नोंदींची प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत. तसेच पीकविमा अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडे विनंती प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. शेतकर्यांचे नुकसान होऊ नये आणि प्रत्येक पात्र शेतकर्याला पीकविमा योजनेचा लाभ मिळावा, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे भाग्यश्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.


