20 हजारांची लाच भोवली : रावेरातील वनरक्षक जळगाव एसीबीच्या जाळ्यात


जळगाव (शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026) : जेसीबीद्वारे गाळ काढल्याच्या मोबदल्यात 20 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना रावेर वनपरिक्षेत्रतील वनरक्षकाला जळगाव एसीबीने अटक केल्याने लाचखोर हादरले आहेत. जगदीश काशिनाथ जगदाळे (27) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. जगदाळे हे अहिरवाडी परिमंडळ, जुनोने बीटला कार्यरत आहेत.

असे आहे लाच प्रकरण
रावेरच्या अर्थमुव्हर्स एजन्सीच्या 40 वर्षीय तक्रारदाराने या प्रकरणी तक्रार दिली आहे. तक्रारदाराच्या परिचीताने मंगरूळ धरणातून शेती कामासाठी गाळ काढण्यासाठी पाटबंधारे विभाग, रावेर यांच्याकडून परवाना घेतला होता. गाळ काढण्याचे ठिकाण लोकसेवक जगदीश जगदाळे यांच्या कार्यक्षेत्रात असून गाळ काढण्याच्या मोबदल्यापोटी 20 हजार रुपये तसेच परिचीत व्यक्तीने ट्रॅक्टरद्वारे गाळ वाहतुकीच्या मोबदल्यापोटी 30 हजार रुपये मिळून एकूण 50 हजारांची लाच मागणी करण्यात आली होती. 28 ऑक्टोबर 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर लाचेची पडताळणी करण्यात आली.

लाच स्वीकारताच अटक
बुधवार, 28 रोजी रोजी जगदाळे हे लाच स्वीकारण्यासाठी रावेरच्या छोरीया मार्केटमधील साईनाथ ज्युस सेंटरमध्ये पोहोचले व तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच एसीबीने त्यांना अटक केली. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, ग्रेडेड उपनिरीक्षक सुरेश पाटील, हवालदार किशोर महाजन, भूषण पाटील, प्रणेश ठाकूर, राकेश दुसाने, मनोज पाटील आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !