विसरवाडी पोलिसांची मोठी कामगिरी : खांडबार्‍यातील ज्ञानमंदिरात चोरी करणार्‍याला बेड्या

दोन गुन्ह्यांची यशस्वी उकल : शैक्षणिक साहित्य आरोपीकडून जप्त


नंदुरबार (मंगळवार, 10 नोव्हेंबर 2026) : खांडबारा गावातील शाळांना लक्ष्य करून संगणक साहित्याची चोरी करणार्‍या आरोपीला विसरवाडी पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अटक केली. राज उर्फ काळू मुकेश गोसावी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून दोन गुन्ह्यांतील संपूर्ण चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

दोन शाळांमध्ये केली चोरी
7 नोव्हेंबर 2026 आणि 9 नोव्हेंबर 2026 रोजी खांडबारा गावातील मो.सा. व ऍग्री हायस्कूलच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने शाळेत प्रवेश करीत शाळेतील तीन कॉम्प्युटर स्क्रीन, तीन सीपीयू, तीन प्रिंटर आणि केबल असा संगणक साहित्याचा मुद्देमाल चोरून नेला होता. चोरीप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.








तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी जाळ्यात
या गुन्ह्यांचा तपास करताना विसरवाडी पोलिसांनी गोपनीय माहितीचे संकलन आणि तांत्रिक विश्लेषणावर भर दिल्यानंतर सहा.निरीक्षक जयेश खलाणे यांना ही चोरी राज उर्फ काळू मुकेश गोसावी याचा सहभाग स्पष्ट होताच त्यास अटक करण्याचे निर्देश दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीची चौकशी केल्यानंतर त्याने दोन्ही गुन्ह्यांतील संपूर्ण चोरीचा मुद्देमाल काढून दिला. या कारवाईमुळे शाळांमधील चोरीचे दोन्ही गुन्हे उघडकीस आले आहेत.

वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई नंदुरबार जिल्ह्याच्या नंदुरबार पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी जयेश खलाणे यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार योगेश डिंगर, पोलीस हवालदार संजय सूर्यवंशी, पोलीस हवालदार हुमायुन पटेल, पोलीस कॉन्स्टेबल गिरीश वांगळे, पोलीस शिपाई प्रमोद शिंदे आणि पोलीस कॉन्स्टेबल श्याम पेढावे यांनी केली.

शाळांमधील शैक्षणिक साहित्याची चोरी करणार्‍या आरोपीचा शोध घेऊन दोन्ही गुन्ह्यांतील मुद्देमाल हस्तगत केल्याने विसरवाडी पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !