यावल शहरात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारावा : बहुजन समाज पार्टीचे नगरपालिकेत निवेदन
यावल (मंगळवार, 10 नोव्हेंबर 2026) : यावल शहरातील अंकलेश्वर -बर्हाणपूर महामार्गालगत प्रस्तावित डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा तसेच पुतळ्याच्या परिसरात स्मारक व वाचनालयाची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने यावल नगरपालिकेत करण्यात आली. याबाबतचे निवेदन गुरूवारी देण्यात आले.
यावल पालिका प्रशासनाला निवेदन
यावल नगरपालिकेत बहुजन समाज पार्टीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनानुसार, यावल शहरातील अंकलेश्वर-बर्हाणपूर महामार्गालगत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा व स्मारक उभारण्याची बहुजन समाजाची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या ठिकाणी पुतळा उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 1989 मध्येच जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेच्या मागील बाजूस नगरपालिकेची 11 वर्षांच्या करारावर दिलेली इमारत आहे. या इमारतीच्या मागील बाजूस नगरपालिकेच्या मालकीची सुमारे पाच हजार चौरस फूट मोकळी जागा उपलब्ध आहे. या जागेचा वापर सध्या अधिकृत दवाखान्यासाठी होत आहे.








नियमांचे पालन करून उभारावा पुतळा
महामार्गालगत पुतळा उभारण्यासाठी जागा उपलब्ध असून, मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेमुळे स्मारक व वाचनालय उभारण्यासही पुरेशी जागा मिळू शकते. महामार्गाच्या नियमांचे पालन करून तसेच रस्त्यापासून सुरक्षित अंतर (सेटबॅक मार्जिन) सोडून या ठिकाणी पुतळा व स्मारकाची उभारणी करणे शक्य आहे असे निवेदनात म्हटले आहे. यावल पालिकेकडून पुतळा, स्मारक व वाचनालय उभारण्याबाबत प्रशासकीय मंजुरी देणारा अधिकृत ठराव बहुमताने पारित करावा, अशी विनंती करण्यात आली. प्रसंगी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष नारायण अडकामोल, उपाध्यक्ष प्रकाश मेघे, भिमराव गजरे, विक्की गजरे, प्रदीप गजरे, भागवत सुरवाडे, मंथन महिरे, प्रमोद पारधे, सुशील केदारेसह मोठ्या संख्येत पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.