कन्हाळ्यात गावठी दारूभट्टी उद्ध्वस्त : एका आरोपीला अटक


भुसावळ : तालुक्यातील शिवपूर कन्हाळा शिवारातील नाल्याजवळ गावठी दारू भट्टी पुन्हा कार्यान्वीत झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी छापा टाकत जुम्मा छट्टू गवळी (रा.कन्हाळा) याच्या मुसक्या आवळल्या. आरोपीच्या ताब्यातून गूळ मोह नवसागर मिश्रित द्रव्याचे 11 ड्रममधील दोन हजार 100 लिटर रसायण व गावठी हातभट्टीची 35 लिटर तयार दारू मिळून 71 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरॐद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहा.निरीक्षक अमोल पवार, सहा.फौजदार सुनील चौधरी, हवालदार विठ्ठल फुसे, युनूस इब्राहिम शेख, प्रवीण पाटील, सपकाळे, युनूस शेख, पोलिस पाटील रेवसिंग पाटील आदींच्या उपस्थितीत करण्यात आली.

समूळ उद्ध्वस्त व्हाव्यात हातभट्ट्या
आतापर्यंत अनेकवेळा शिवपूर कन्हाळा येथे गावठी हातभट्टीवर कारवाई करण्यात आली मात्र काही दिवसानंतर पुन्हा येथे हातभट्टी सुरू होत असल्याने पोलिस व नागरीकांसाठी हा चर्चेचा विषय ठरला आहे. पोलिस प्रशासनाने समूळ अवैध धंद्यांचा नायनाट करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !