भुसावळातील अतिक्रमितांच्या पुर्नवसनासाठी रीपाइंचे निदर्शने
7 डिसेंबरला भुसावळ-जळगाव लाँग मार्चचा इशारा
भुसावळ : शहरातील रेल्वे उत्तर वार्ड, 15 बंगला आदी भागात रेल्वेने दोन वर्षांपूर्वी अतिक्रमण काढले, मात्र पाच हजार नागरीकांचे पूर्नवसन केले नाही, या अतिक्रमण धारकांना तत्काळ घरे मिळावी या मागणीसाठी रिपाइंने शुक्रवारी प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. या मागणीची पूर्तता न झाल्यास 7 डिसेंबरला लाँग मार्च काढण्याचा इशारा देण्यात आला.
7 डिसेंबर रोजी लाँग मार्चचा इशारा
रेल्वे प्रशासनाने रेल्वे उत्तर वॉर्ड व 15 बंगला भागात अतिक्रमण हटाव मोहिम राबवून 5 हजार लोकांना उघड्यावर आणले. दोन वर्षांपासून हे कुटूंबीय बेघर आहेत. दलित, मुस्लिम आदी अतिक्रमणधारकांच्या पूर्नवसनाठी अनेक आंदोलने होऊनही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. या प्रकरणी रिपाइंने शुक्रवारी प्रांताधिकारी कार्यालयासमोर निर्दशने करुन या प्रकरणी लक्ष वेधले. जिल्ह्यात अनेक गावांमध्ये राजकिय लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून अतिक्रमणधारकांचे पूर्नवसन केले जाते, मात्र भुसावळ शहरात या प्रकरणी दुर्लक्ष का केले जात आहे? असा प्रश्नही रीपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी यावेळी उपस्थित केला. या मागणीबाबत प्रशासनाने विचार न केल्यास आगामी काळात रिपाईतर्फे 7 डिसेंबर रोजी भुसावळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्राऊंडपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर लाँग मार्च काढला जाईल, असा इशाराही निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. यावेळी रीपाइंचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, कोषाध्यक्ष लक्ष्मण जाधव, युवा जिल्हाध्यक्ष रवी सपकाळे, गिरीष तायडे, प्रकाश सोनवणे, पप्पू सुरडकर, शरद सोनवणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

