नगरसेवकाच्या भावाला लुटणारा तिसरा आरोपीही जाळ्यात
त्या दोघा आरोपींना 26 पर्यंत पोलीस कोठडी
भुसावळ : नगरसेवक पिंटू ठाकूर यांच्या भावाला चाकूचा धाक दाखवत लुटण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री आठ वाजता जामनेर रोडवरील दिनदयाल नगरातील गिरीष किराणा दुकानाच्या बाजुच्या बोळीत घडली होती. या प्रकरणी अशोक उर्फ भाचा सदाशिव कोळी (रा.दिनदयाल नगर, भुसावळ) व जावेद उर्फ पोटली नवाब बागवान (रा.पंचशील नगर) यांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने 26 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती तर अन्य पसार असलेल्या संशयीताच्यादेखील मंगळवारी हनुमान नगरातील पोलिसांनी मुसक्या आवळल्या. दरम्यान, या गुन्ह्यात आरोपींची ओळख परेड करावयाची असल्यास तिसर्या आरोपीचे नाव गुप्त ठेवण्यात आले तर मंगळवारी त्यास न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिस कोठडीचा हक्क राखून आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
चाकूच्या धाकावर 4900 रुपये लांबवले
नगरसेवक पिंटू ठाकूर यांचे बंधू अनिल हनुमानसिंग ठाकुर (57, रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) यांचा रीक्षा व्यवसाय असून भाडे तत्वावर दिलेल्या रीक्षांचे भाडे वसुलीसाठी ते जामनेर रोडवरील दिनदयाल नगरातील गिरीष किराणा दुकानाच्या राजू डोलू व अमीर यांच्याकडे आल्यानंतर अचानक पाठीमागून आलेल्या इसमाने गळ्यावर चाकू लावला तर दुसर्याने पँटच्या उजव्या खिशातील चार हजार 900 रुपयांची रक्कम काढत खाली पाडून रक्कम लांबवत पोबारा केला होता. या प्रकरणी तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील दोघांना सोमवारी अटक करण्यात आली तर तिसर्या अनोळखीच्या मंगळवारी मुसक्या आवळण्यात आल्या.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलिस निरीक्षक कृष्णा भोये, गणेश धुमाळ, किशोर महाजन, रमण सुरळकर, रवींद्र बिर्हाडे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, रवींद्र तायडे, कृष्णा देशमुख, सचिन चौधरी, चेतन ढाकणे, सुभाष साबळे आदींनी केली. पुढील तपास सहा.निरीक्षक कृष्णा भोये, रवींद्र तायडे करीत आहेत.

