यावल तालुक्यात सर्रास गुटख्याची विक्री
कारवाईला अन्न औषध प्रशासनासह पोलिस प्रशासनाकडून ‘खो’
यावल : तालुक्यात गावा-गावात सर्व ठिकाणी सर्रासपणे मोठया प्रमाणावर विमल गुटक्याची विक्री सुरू आहे. अन्न औषध प्रशासनासह पोलिस प्रशासनाकडून धडक कारवाई होत नसल्याने तरुण पिढीसह शाळकरी मुले व्यसनांच्या आहारी जात आहेत.
सहज उपलब्ध होतो गुटखा
गेल्या अनेक दिवसांपासून यावल तालुक्यातील फैजपूरसह सर्व गावात न्यायालयाने बंदी घातलेल्या मानवी जीवनाला घातक असणारा विमल गुटक्याची सर्वत्र खुलेआम विक्री करण्यात येत आहे. गावागावातील पानटपर्या, किराणा दुकान व इतर सार्वजनिक ठिकाणी अगदी सहज मिळणार्या गुटख्यामुळे अगदी अल्पवयीन शाळकरी मुले ही घातक अशा गुटख्याच्या आकर्षणाच्या आहारी जावून गुटखा खात असल्याचे अत्यंत धक्कादायक चित्र पहावयास मिळत आहे.
परप्रांतातून सहज उपलब्ध होतो गुटखा
यावल तालुक्यात शेजारच्या गुजरात व मध्यप्रदेश या परप्रांतातून एस.टी.बस तसेच इतर वाहनांनी मोठ्या व प्रमाणावर चोरट्या मार्गाने गुटख्याची तस्करी सुरू आहे. यावल तालुक्यात एका महिन्यात सुमारे 30 ते 35 लाखांचा गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणावर विमल गुटख्याची सर्रासपणे विक्री होत असतांना अन्न व औषद्य प्रशासन व पोलिस विभागाला याची माहिती नसावी का? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.

