बहिण-भाच्याचा अपघाती मृत्यूचा मेहुण्यांच्या खुनातून घेतला बदला
शालकासह दोघांना अटक : बुलढाणा जिल्ह्यातील घटना : भुसावळ शहर पोलिसांचा यशस्वी तपास
भुसावळ : दुचाकी अपघातात बहिणीसह भाचाचा मृत्यू झाल्यानंतर या अपघाताला मेहुणाच जवाबदार असल्याचा राग मनात ठेवून सख्ख्या शालकानेच आपल्या मेहुण्याची एकाच्या मदतीने गळा दाबून व मारहाण करून हत्या केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलिस ठाणे हद्दीत घडली होती. भुसावळ शहर पोलिसांनी बेपत्ता असलेल्या इसमाचा अपहरणाचा गुन्ह्याच्या तपासात अत्यंत बारकाईने या गुन्ह्याचा उलगडा करीत दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. रमेश रामदास पवार (21, कंडारी, ता.भुसावळ) व सुनील रामेश्वर गायकवाड (22, कोथळी, ता.मोताळा, जि.बुलढाणा) अशी अटकेतील आरोपींची नावे असून त्यांना न्यायालयाने 30 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
अपहरणाच्या गुन्ह्यात झाला हत्याकांडाचा उलगडा
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, फिर्यादी सुनीता युवराज पवार (30, यावल नाका, भुसावळ) यांचा सख्खा भाऊ राजीव शामराव मिरठकर (28, रा.मोताळा) हे हल्ली भुसावळात बहिणीकडे वास्तव्यास होते. 9 ऑक्टोबरपासून ते बेपत्ता झाल्याने त्यांचा शोध सुरू असताना त्यांचा शोध न लागल्याने शहर पोलिसात 20 नोव्हेंबर 20 रोजी मिरठकर यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनीता पवार यांनी आपल्या भावाचे अपहरण झाल्याची शंका व्यक्त करीत या प्रकाराला त्यांचा सख्खा साला सुनील रामेश्वर गायकवाड (22, कोथळी, ता.मोताळा, जि.बुलढाणा) हा जवाबदार असल्याचा आरोप केला होता. शहर पोलिसांनी चौकशीत संशयीत म्हणून त्यास ताब्यात घेत बोलता केल्यानंतर त्याने आपल्या मेहुण्याची रमेश रामदास पवार (21, रा.कंडारी) याला सोबत घेत हत्या केल्याची कबुली दिली.
बहिणीच्या मृत्यूचा घेतला बदला
पोलिस चौकशीत आरोपी सुनील गायकवाड याने वाशिम जिल्ह्यातील पिंपळगाव राजा येथे मेहुण्याच्या दुचाकीला मे 2020 महिन्यात अपघात झाल्याची सांगत या अपघातात बहिणीसह भाचाचा मृत्यू ओढवला मात्र मेहुणा राजीव मिरठकर यास काही झाले नसल्याने त्याच्या डोक्यात या बाबीचा राग होता व या रागातूनच त्याने रमेश पवार या आरोपीला सोबत घेत त्याचा जळगाव जामोद पोलिस ठाणे हद्दीतील बस्तान भेंडवळ रोडवरील जंगलात मारहाण करून व गळा आवळून खून केल्याची माहिती दिली. त्यानंतर शहर पोलिसांनी बुलढाणा जिल्हा पोलिसांना सूचित केले होते तर 31 ऑक्टोबर 2020 रोजी जंगलात अनोळखीचा इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याची माहिती समोर आल्याने तक्रारदार व आरोपींना घटनास्थळी नेल्यानंतर मयत हाच तक्रारदाराचा भाऊ असल्याचे निष्पन्न झाल्याने दोघा आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयाने 30 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
बँकेत पैसे आल्याच्या आमिषाने केला घात
मयत राजीव शामराव मिरठकर यांच्या पत्नीसह मुलाचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या अपघातानंतर विम्याचे पैसे मोताळा येथील बँकेच्या खात्यात आल्याचे आमिष त्यांचा साला सुनील गायकवाड याने दाखवत मेहुण्याला आरोपी रमेश पवारसह जंगलात नेले व तेथे त्यास बेदम मारहाण करून त्याचा गळा आवळल्याने त्याचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. विशेष म्हणजे आरोपी सुनील गायकवाड यांच्याकडे मयत मिरठकर यांच्या दोन्ही मुली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यांनी उघडकीस आणला गुन्हा
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली शहरचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सहा.निरीक्षक संदीप डूनगहू आदींनी अत्यंत बारकाईने या गुन्ह्याचा उलगडा करीत दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

