भुसावळात अमृतच्या जलकुंभावरून पडल्याने मजुराचा मृत्यू
भुसावळ : शहरातील शांती नगरात अमृत योजनेच्या जलकुंभाचे बांधकाम सुरू असताना पाय घसरून पडल्याने मजुराचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. विठ्ठल मुरलीधर सपकाळे (39, राहुल नगर, भुसावळ) असे मयत मजुराचे नाव आहे. शहरातील शांती नगरात अमृत योजनेच्या जलकुंभाचे बांधकाम सुरू असून मंगळवारी दुपारी आठ ते दहा मजुर काम करीत असताना सपकाळे यांचा लोखंडी खांब्यावरून पाय सरकल्याने ते सुमारे 10 मीटर उंचीवरून खाली कोसळले. अत्यवस्थ अवस्थेत त्यांना गोदावरी रुग्णालयात हलवले असता त्यांना मयत घोषित करण्यात आले. या प्रकरणी साईट सुपरवायझर नवनाथ विठ्ठल इंगळे (औरंगाबाद) यांनी खबर दिल्यावरून शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनास्थळी शहर निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी भेट देवून पाहणी केली असता घटनास्थळी मयत कामगाराचा सेप्टी बेल्ट व हेल्मेट आढळले. बुधवारी दुपारी शवविच्छेदनानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परीवार आहे. तपास उपनिरीक्षक शरीफ काझी करीत आहेत.

