भुसावळात वाहतूक शाखेची धडक कारवाई ः दोन दिवसात 87 हजार दंड वसुल


फटाके फोडणार्‍या बुलेटसह विना प्लेट दुचाकींवर फोकस : बेशिस्त वाहनधारकांची गय नाही : पोलिस उपअधीक्षक

भुसावळ : भुसावळचा पदभार घेतल्यानंतर पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी शहरातील बेशिस्त वाहनधारकांवर वठणीवर आणण्याचा चंग बांधला असून त्यांच्या मनोदयाप्रमाणे धडक कारवाईदेखील होताना दिसत असल्याने शहरवासीयांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. शहर वाहतूक शाखेला नवीनच आलेले सहा.निरीक्षक संदीप आराक यांनीदेखील वरीष्ठांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करीत वाहतूक नियम धाब्यावर बसवणार्‍या वाहनधारकांवरही दंडात्मक कारवाई करून त्यांना वठणीवर आणले आहे. 24 व 25 नोव्हेंबर या दोन दिवसात तब्बल 417 वाहनधारकांविरुद्ध कारवाई करण्यात येवून 86 हजार 600 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

फटाके फोडणार्‍या बुलेट रडारवर
शहरातील काही धेंडांनी बुलेटच्या सायलन्सरमध्ये बदल केल्यानंतर बुलेटचा जोरदार फटाक्यांसारखा आवाज केल्याने वाहनधारकांमध्ये भीती पसरली होती शिवाय या प्रकारामुळे अपघात वाढण्याची शक्यताही होती. या अनुषंगाने पाच बुलेट जप्त करण्यात आल्या. त्यातील तीन बुलेट चालकांना 15 हजार 400 रुपयांचा दंड सुनावण्यात आला तर अन्य दोघा बुलेटबाबत आरटीओ जळगाव यांना अहवाल पाठवण्यात आला आहे. वाहतुकीचे नियम न पाळणार्‍या तब्बल 91 रीक्षा.चालकांवर कारवाई करण्यात आली तसेच फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या तीघा दुचाकींसह 25 नंबरप्लेट खराब असलेल्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली तसेच ट्रीपल सीट 20 तसेच 102 अन्य केसेस करण्यात आल्याचे आराक यांनी सांगितले.

महिनाभरात 12 लाख 34 हजारांचा दंड
उपअधीक्षक वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेने सहा.निरीक्षक संदीप आराक यांच्या नेतृत्वात 17 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान पाच हजार 734 केसेसच्या माध्यमातून बारा लाख 34 हजार आठशे रुपयांचा दंड वसुल केला आहे. दरम्यान. विना लायसन्स, ट्रिपल सीट, मोबाईल फोनवर बोलून दुचाकी चालवणारे, हेल्मेटचा तसेच विना नंबर प्लेट व चित्र-विचित्र नंबर प्लेट असलेल्या वाहनधारकांसह अल्पवयीन वाहनधारकांवर धडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !