रावेर बाजार समितीत कापूस खरेदीसाठी नाव नोंदणीला सुरुवात
रावेर : तालुक्यातील शेतकर्यांसाठी रावेर बाजार समितीत शुक्रवारपासून कापूस खरेदीसाठी अधिकृत नाव नोंदणीला सुरुवात झाली आहे. रावेरात कापूस खरेदी केंद्र सुरू होणार की नाही? याबाबत रावेर तालुक्यातील शेतकर्यांमध्ये संभ्रम होता. यासाठी काही दिवसांपूर्वी बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, नीळकंठ चौधरी, डॉ.राजेंद्र पाटील, सचिव गोपाळ महाजन हे औरंगाबाद गेले होते. सीसीआय प्रबंधक यांना भेटून शेतकर्यांचा कापूस खरेदी करण्याची विनंती शिष्टमंडळांनी केल्यानंतर शुक्रवारपासून नाव नोंदणीला सुरुवात झाली आहे. रावेरतालुक्यातील ज्या शेतकर्यांना आपली कपाशी सीसीआयला विक्री करायची आहे त्यांनी बाजार समितीमध्ये आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स व सात बारा उतारा घेऊन नाव नोंदणी करावी यासाठी पाच हजार आठशे रुपये भाव निश्चित करण्यात आला असून हेक्टरी 40 क्विंटल खरेदी करण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले आहे.

